हिंदी सिनेसृष्टीचा बेताज बादशाह कोण? असा प्रश्न विचारला गेला तर कुणीही सहजपणे उत्तर देईल अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन या नावात जी जादू आहे ती आपण अजूनही अनुभवतो आहोत. पडदा व्यापून टाकणं म्हणजे काय? ते अमिताभकडे पाहिलं की कळतं. त्याच्या मागे लागलेलं ‘महानायक’ हे बिरुद उगाच नाही तर त्याच्या प्रचंड मेहनतीचं आणि योगदानाचं ते फळ आहे. ज्याच्यावर पिटातल्या प्रेक्षकापासून सुटाबुटात वावरणाऱ्या प्रत्येकाने प्रेम केलं त्या अमिताभचा आज वाढदिवस. अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी आजही पर्वणीच असते. कारण आजही त्यांच्या प्रतीक्षा या बंगल्याबाहेर लोक गर्दी करतात.
छोटा पडदाही ‘आपलाच’ केलेला मोठा नायक
के.बी.सी. अर्थात कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून अमिताभने छोटा पडदाही व्यापून टाकला आहे. त्याची प्रश्न विचारण्याची खास शैली, लोकांचं म्हणणं ऐकून घेणं, मनमुराद हसत दाद देणं, “नमश्कार देवीयों और सज्जनो मै अमिताभ बच्चन बोल रहाँ हूँ..” म्हणणं हे सगळं काही लाजवाब. तसंच जेव्हा जाहिराती लागतात त्यातल्या दर तिसऱ्या जाहिरातीत तो दिसत राहतो. अँग्री यंग मॅन, अँग्री ओल्ड मॅन सगळी बिरुदं बिनधास्त वागवत तो आपल्या भूमिकांशी प्रामाणिक राहतो. बावनकशी मनोरंजन करतो. त्यामुळेच तो अमिताभ आहे त्याच्यासारखा दुसरा नायक आजवर झाला नाही. ‘अरे तू काय बच्चन आहेस का?’ किंवा ‘स्वतःला काय बच्चन समजतोस का?’ ही वाक्यं कधी कधी आजही कानावर येतात आणि त्यातून या महानायकाची उंची उलगडत जाते. आजच्या पिढीलाही त्याने आपलंसं करुन घेतलं आहे. आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बच्चनने ८१ व्या वर्षात पदार्पण केलंय. मात्र त्याचं हे बच्चन होतं जाणं फार वळणांचं आणि संघर्षाचं आहे.
व्हॉईस आर्टिस्ट म्हणून सुरुवात
अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९६९ मध्ये आलेल्या मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवन शोम’ या चित्रपटातून झाली. उत्पल दत्त आणि सुहासिनी मुळ्ये या दोन कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. अमिताभ बच्चन या सिनेमात पडद्यावर दिसला नाही पण ऐकू येत राहिला. बरोबर या सिनेमासाठी त्यांनी व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं. त्यानंतर आला ‘सात हिंदुस्थानी’. अमिताभ पडद्यावर झळकला तो हा चित्रपट. ख्वाजा अहमद अब्बास यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. १९७१ मध्ये आला ‘आनंद’ यातला अमिताभने साकारलेला भास्कर अर्थात बाबू मोशाय हा लोकांच्या आजही स्मरणात आहे. ‘आनंद’ची भूमिका राजेश खन्नाने साकारली होती. राजेश खन्ना तेव्हा हिंदी सिनेसृष्टीचा पहिला सुपरस्टार झाला होता. मात्र अमिताभची ‘आनंद’ सिनेमातली भूमिका लोकांच्या स्मरणात राहिली. त्यातल्या ‘बाबू मोशाय’चा पुढे ‘अँग्री यंग मॅन’ होईल हे मात्र तेव्हा कुणाला पटलं नसतं. ‘प्यार की कहानी’, ‘परवाना’, ‘रेश्मा और शेरा’, ‘संजोग’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘बन्सी का बिरजू’, ‘एक नजर’, ‘रास्ते का पत्थर’, ‘गरम मसाला’ अशा चित्रपटांमध्ये अमिताभने काम केलं. हे चित्रपट खूप कमाल करु शकले नाहीत. मात्र १९७२ मध्ये आला ‘जंजीर’.
‘जंजीर’ सिनेमाने अमिताभची ‘अँग्री यंग मॅन’ची इमेज तयार केली आणि पुढे ती बिंबवलीही. प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीर सिनेमात अमिताभ हिरो, प्राण ग्रे शेडमध्ये आणि अजित व्हिलन. हिरोला पडणारं एक विशिष्ट स्वप्न, त्यातून पुढे घडत जाणाऱ्या गोष्टी. मग अजितला पाहिल्यानंतर अचानक काय घडलं होतं आठवणं हे सगळं ज्या पद्धतीने गुंफलं गेलं होतं त्यामुळे हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि हिंदी सिनेसृष्टीला अमिताभची नवी ओळख झाली. यानंतर ‘नमक हराम’ आला. ‘आनंद’ सिनेमात राजेश खन्नाने सगळा पडदा व्यापला होता आणि अमिताभ लक्षात राहण्यासारखा ठरला होता. या सिनेमात उलट झालं. या सिनेमाविषयीचा एक किस्सा शिरीष कणेकरांनीही सांगितला आहे.
काय आहे नमक हराम सिनेमाचा शिरीष कणेकरांनी सांगितलेला किस्सा?
“नमक हराम हा सिनेमा जेव्हा आला तेव्हा राजेश खन्नाला अमिताभची भूमिका करायची होती. हृषिकेश मुखर्जींनी त्याची समजूत घातली आणि त्याला सांगितलं की तुला जी दिली आहे ती भूमिकाच तू कर. अमिताभला अमिताभची भूमिका करु दे. त्याने हृषिकेश मुखर्जींचं ऐकलं. सिनेमा रिलिजच्या आधी प्रीमियर होता. राजेश खन्नाने तो पाहिला. त्यानंतर मला राजेशच्या तोंडून तो किस्सा ऐकून अंगावर काटा आला होता. कारण राजेश म्हणाला ‘मी सिनेमा पाहून आलो आणि मनाशी म्हणालो अरे यार दुसरा सुपरस्टार पैदा हो गया!’ एक अख्खं संस्थान बरखास्त होतंय हे त्याच्याच तोंडून ऐकताना माझ्या अंगावर काटा आला होता.” २०१९ च्या एका कार्यक्रमात शिरीष कणेकरांनी हा किस्सा सांगितला होता.
मग काय अमिताभची यशस्वी घोडदौड सुरुच झाली. ‘अभिमान’, ‘बेनाम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘मजबूर’, ‘जमीर’, ‘दिवार’, ‘शोले’ यामधून तो प्रेक्षकांना भेटत राहिला आणि सिनेमाचा पडदा आपल्या अभिनयाने आणि खास बच्चन स्टाईलने व्यापत राहिला.
शोलेमध्ये धर्मेंद्रमुळे मिळाला जयचा रोल
रमेश सिप्पी यांनी ‘शोले’ सिनेमाची निर्मिती करायचं ठरवलं तेव्हा ‘जय’ च्या भूमिकेसाठी पहिली पसंती अमिताभला नव्हती. जयच्या भूमिकेसाठी त्यांनी शत्रुघ्न सिन्हाला विचारलं होतं. मात्र या सिनेमात धर्मेंद्र यांचीही भूमिका मोठी होती. शत्रुघ्न सिन्हा त्या काळात दोन अभिनेते असलेल्या सिनेमात काम करत नव्हते. त्यामुळे त्यांनी शोले नाकारला. यानंतर आता जयच्या भूमिकेसाठी कुणाला घ्यावं हा प्रश्न रमेश सिप्पींना पडलाच होता. धर्मेंद्र यांनी त्यांना अमिताभचं नाव सुचवलं आणि जयची भूमिका अमिताभला मिळाली. जय-विरु ही चित्रपट सृष्टीतली अजरामर जोडी झाली आहे.
‘दिवार’ सिनेमासाठीही पहिली चॉईस नव्हता अमिताभ
यश चोपडा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांनी जेव्हा ‘दिवार’ सिनेमा निर्मिती करायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची पहिली पसंती राजेश खन्ना, नवीन निश्चल आणि वैजयंती माला अशी होती. विजयची भूमिका राजेश खन्ना, रविच्या भूमिकेत नवीन निश्चल आणि या दोघांची आई वैजयंती माला अशी ठरली होती. मात्र राजेश खन्ना आणि सिनेमाचे लेखक सलीम-जावेद यांच्यात काही खटके उडाले त्यामुळे राजेश खन्नाने सिनेमा सोडला. त्यानंतर नवीन निश्चल आणि वैजयंती माला यांनीही सिनेमात काम करायला नकार दिला. ज्यानंतर विजयची भूमिका मिळाली अमिताभला, रविची शशि कपूरला आणि आईची भूमिका केली निरुपा रॉयने. हा सिनेमा हाजी मस्तान या मुंबईतल्या कुख्यात गँगस्टरवर बेतला होता असं सांगितलं जातं. मात्र अमिताभने या सिनेमातला ‘विजय’ लोकांच्या मनावर कोरला. “मै आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता” म्हणत एका खास अॅटीट्युडमध्ये वावरणारा विजय, डॉकवर काम करणारा मजूर रुपातला विजय, बिल्ला नंबर 786 बाळगणारा विजय या सगळ्याचं कसब अमिताभने सिनेमातून दाखवून दिलं.
१९७३ पासून अमिताभच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला तो पुढची २० ते २१ वर्षे. वैविध्यपूर्ण सिनेमातून आपली छाप सोडत अमिताभने अभिनय केला. ‘अमर अकबर अँथनी’मधला अँथनी, ‘चुपके चुपके’ मधला परिमल त्रिपाठी, ‘परवरीश’मधला अमित, ‘त्रिशूल’मधला विजय, ‘मुक्कदर का सिकंदर’ मधला सिकंदर, ‘मिस्टर नटवरलाल’ मधला नटवर सिंग, ‘सुहाग’मधला अमित कपूर, ‘शान’मधला विजय, ‘याराना’तला किशन, ‘लावारीस’मधला हिरा, ‘कालिया’तला कल्लू, ‘सत्ते पे सत्ता’ मधला रवि आणि बाबू, ‘नमक हलाल’ मधला अर्जुन सिंग, ‘शक्ती’मधला विजय कुमार, ‘शहेनशाह’मधला शहेनशाह ‘शराबी’तला विकी कपूर अशा कितीतरी भूमिका सांगता येतील. ‘जादूगर’, ‘तुफान’ असे त्याचे काही चित्रपट फ्लॉपही झाले. त्यानंतर १९९० मध्ये आला ‘अग्निपथ’.
अग्निपथमधला रोल खासच
मुकुल आनंदच्या ‘अग्निपथ’ या सिनेमात अमिताभने साकारलेला ‘विजय दिनानाथ चौहान’ हा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाराच होता. डॅनी आणि अमिताभ यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहताना दोघांनी म्हटलेले संवाद आजही लोकांच्या स्मरणात आहेत. “यहाँ जंगल का कानून चलता है”, “विजय दिनानाथ चौहान, पुरा नाम.. मालूम”, “साप और नेवले का लडाईमें साप मरता हैं कांचा” असे कितीतरी संवाद आजही आपल्या तोंडी आहेत. या दोघांची म्हणजेच डॅनी आणि अमिताभच्या अभिनयाची जुगलबंदी ‘हम’ सिनेमातही दिसली होती. १९९० च्या दशकानंतर हळूहळू सिनेमा चालेनासे झाले. ABCL ही अमिताभची कंपनीही बुडाली. अमिताभ समाजवादी पक्षाकडून खासदारही झाला होता. पण राजकारण त्याला फारसं काही जमलं नाही, त्यात तो रमला नाही. ‘प्रोफेसर की पडोसन’, ‘मृत्यूदाता’, ‘लाल बादशाह’ असे काही चित्रपट पडले. त्यामुळे अमिताभ कर्जबाजारी झाला होता. मात्र त्याचवेळी केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती सुरु झालं आणि त्याच्या करीअरच्या ‘डुबती नय्या’ला मोठाच हात मिळाला.
सेकंड इनिंगही प्रचंड प्रभावी
अँग्री यंग मॅन म्हणून त्याने गाजवलेली ही कारकीर्द आणि तिचा आलेख खालावणं हे सगळं जवळून पाहिलेल्या अमिताभची सेकंड इनिंगही प्रभावी ठरली. ‘मोहब्बते’ मधून तो नारायण शंकर बनून तो आला. त्या वर्षीचं बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचं फिल्मफेअरही घेऊन गेला. त्यानंतर ‘अक्स’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘आँखे’ अशा सिनेमांतून त्याने चरित्र भूमिका आणि काहीशा ग्रे शेड असलेल्या भूमिकाही केल्या. २००३ मध्ये आलेला बूम हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतला वादग्रस्त सिनेमा ठरला. या सिनेमात काही आक्षेपार्ह दृश्यं होती ज्यावरुन चांगलाच वादही झाला होता. मात्र त्यानंतर आलेला ‘बागबान’, ‘खाकी’, ‘लक्ष्य’ या सिनेमांनी त्याची इमेज पुन्हा सुधारली. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित सरकार या सिनेमात अमिताभने केलेली मध्यवर्ती भूमिका ही थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ जाणारी होती. या सिनेमाचे एकूण तीन पार्ट निघाले. त्यातला सुभाष नागरे मात्र अमिताभच होता.
निशब्द सिनेमाचा वाद
निशब्द या सिनेमात अमिताभने त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या जिया खानसह रोमान्स केला. या सिनेमावरुनही चांगलाच वाद झाला होता. बूम हा अमिताभचा १२५ वा तर निशब्द हा १५० वा सिनेमा होता आणि दोन्ही चित्रपट वाद निर्माण करणारे ठरले.
‘पा’ सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार
आर. बाल्की दिग्दर्शित ‘पा’ या सिनेमात अमिताभने एक वेगळाच प्रयोग केला. असा प्रयोग करण्याचं धाडस त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही केली नव्हती. या सिनेमात अमिताभने एका १२ वर्षाच्या मुलाची भूमिका साकारली. ऑरो असं या व्यक्तिरेखेचं नाव होतं. ऑरो असतो तर १२ वर्षांचा पण Progeria या आजारामुळे तो वयाच्या पाचपट मोठा दिसत असतो. या सिनेमात अमिताभच्या आईचं काम विद्या बालनने केलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या सिनेमानंतर अमिताभ आपल्या भूमिकांमध्ये काही प्रयोग करु लागला. ‘शमिताभ’ , ‘पिकू’, ‘वझीर’, ‘पिंक’ ,’झुंड’ असे काही खास वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि त्यातल्या त्याच्या वयाला साजेशा भूमिका त्याने साकारल्या. आता याच महिन्यात अमिताभला बर्थ डे गिफ्ट मिळणार आहे ते गणपथ या सिनेमाच्या रुपाने. कारण हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होतो आहे.
अमिताभने ज्या काळात सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं तिथे त्याचे स्पर्धक होतेच. राजेश खन्ना, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा या नटांना त्याने लिलया बाजूला ठेवलं. धर्मेंद्र यांच्यासह काम करतानाही त्यांनी निवडक चित्रपटच बरोबर केले. तसंच विनोद खन्ना आणि अमिताभ यांच्यातही शीतयुद्ध होतं असं म्हणतात. हे दोघंही एकमेकांची भूमिका तपासून घेत असत. सारख्या लांबीची भूमिका नसेल तर सरळ सिनेमा करायला नकार देत असत. अमिताभला खलनायकी आणि विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते कादर खान यांनीही नावं ठेवली होती. कादर खान यांनी अनेक चित्रपटांसाठी संवाद लेखन केलं आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की अमिताभला खूप इगो होता. त्यामुळे मी त्याच्याशी संवाद सोडून दिला. अभिनेत्री परवीन बाबीनेही अमिताभवर काही गंभीर आरोप केले होते. अमिताभ बच्चनने अनेक नायिकांसह काम केलं. मात्र त्याची हिट जोडी ठरली ती रेखा बरोबरच. १९८१ मध्ये आलेला ‘सिलसिला’ हा या जोडीचा शेवटचा सिनेमा. त्यानंतर दोघांनी एकमेकांसह कधीच काम केलं नाही.
अमिताभ आणि रेखाचं अफेअर आणि तो किस्सा
अमिताभ आणि रेखाच्या जोडीने ‘दो अंजाने’, ‘आलाप’, ‘इमान धरम’, ‘खून पसीना’, ‘कस्मे वादे’, ‘मुक्कदर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘सुहाग’, ‘राम-बलराम’ आणि ‘सिलसिला’ या सिनेमांमध्ये काम केलं. हे सगळे चित्रपट तिकिटबारीवर पैसावसुल ठरले. तसंच प्रेक्षकांनाही त्यांची जोडी प्रचंड आवडली. ‘सिलसिला’ या सिनेमात दाखवण्यात आलेली गोष्ट ही अमिताभ आणि रेखाच्या नात्यावरच होती असंही तेव्हा बोललं गेलं होतं. तसंच अमिताभ यांना त्यांच्या वडिलांनी रेखाबरोबर परत काम न करण्याचा सल्ला दिला होता असंही सांगितलं जातं. त्यात कितपत सत्य आहे हे ठाऊक नाही. पण एकामागोमाग एक हिट सिनेमा देणाऱ्या या जोडीचा १९८१ मध्ये आलेला सिलसिला हा सिनेमा शेवटचा सिनेमा ठरला. यानंतर दोघांनी एकत्र एकाही सिनेमांत काम केलं नाही. रेखाशी अमिताभ यांची वाढणारी जवळीक आणि त्यानंतर तयार होणाऱ्या बातम्या या जया बच्चन यांना प्रचंड प्रमाणात खटकल्या होत्या असंही त्यावेळी बोललं गेलं. सिलसिला सिनेमात ‘रंग बरसे..’ हे होळीचं गाणं आणि ‘ये कहाँ आ गये हम..’ ही दोन खास गाणी आहेत. या गाण्यांमधली अमिताभ आणि रेखाची केमिस्ट्री पाहिली तर त्या दोघांचं नातं कुठवर गेलं असेल याचा सहज अंदाज बांधता येतो. रेखाचं सिंदूर लावणं, अमिताभच्या गाण्यावर तिने डान्स करणं हे सगळं त्यानंतरही झाल्याचं दिसून आलं आहे. रेखा हा अमिताभच्या आयुष्यातला असा अध्याय आहे जो म्हटलं तर खूप गोडही आहे आणि तितकाच कडवाही..
‘कुली’च्या सेटवरचा तो अपघात
‘कुली’ या सिनेमात पुनीत इस्सरकडून अमिताभला खरीखुरी फाईट लागली आणि तो अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला. जेव्हा अमिताभ या अपघातानंतर मुंबईतल्या रुग्णालयात उपचार घेत होता तेव्हा लोकांनी त्याच्यासाठी देव पाण्यात ठेवले होते, सिद्धीविनायकाला नवस बोलले होते. या सीनबद्दल पुनीत इस्सारने सांगितलं होतं की, ” ‘कुली’तला हा सीन करण्याआधी आम्ही (मी आणि अमिताभ) तीन-चार वेळा प्रॅक्टिस केली होती. सीन सुरु झाला तेव्हा नेमकं काय घडलं ते कुणालाच कळलं नाही. जो ठोसा बसला तो अमिताभ यांना जिव्हारी लागला. यानंतर मी अमिताभ बच्चन यांना भेटायला रुग्णालयातही गेलो होतो. त्यांची माफीही मागितली. तेव्हा त्यांनी मला पुढे काही त्रास होऊ नये म्हणून तशा अवस्थेतही मला दरवाजापर्यंत सोडायला आले होते. अर्थात जो प्रसंग घडला त्यामुळे मला चार ते पाच वर्षे काम मिळत नव्हतं. त्यानंतर हळूहळू कामं मिळत गेली” असं पुनीतने सांगितलं होतं. अमिताभच्या आयुष्यात असे अनेक कठीण प्रसंग आले.. पण त्यातून तो तावून सुलाखून बाहेर पडला आणि घडलाही.
अमिताभ आणि त्याचं घड्याळांचं कलेक्शन, त्याचं घराबाहेर येऊन हात दाखवणं, त्याचे बंगले, त्याची स्टाईल, त्याचं गाणं म्हणणं, त्याचं इंस्टाग्रामवर सक्रिय असणं, त्याचा खास खर्जातला आवाज, त्यानी केलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका, लोकांचं अनंतकाळासाठी मिळालेलं प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिनेसृष्टीवर केलेलं अधिराज्य या बळावर अमिताभ महानायक म्हणून तुमच्या माझ्या मनात उभा आहे. तो कालही वलयांकित होता, आजही आहे आणि उद्याही राहिल कारण अमिताभ नावाचं हे वलय मोहून टाकणारं आहे.