हिंदी चित्रपट आणि झाडाभोवती गाणी गात नाचणारे नायक-नायिका यांचे फार जुने आणि घट्ट नाते आहे. या नायक-नायिकांची उपहासाने चर्चा होणे हे सुद्धा जुनेच! परंतु टीका करणाऱ्यांनो, तुम्ही एकदा सहज म्हणून असे गाणे गात झाडाभोवती नाचून पहायचा प्रयत्न करून बघा, असे आव्हान अमिताभने या ‘टीकातूर जंतूं’ना दिले आहे.
एकेकाळी हिंदी चित्रपटात नाचगाण्याला पर्याय नव्हता. पण, आपल्या जुन्याजाणत्या चित्रपटकर्मीनी ती एक संस्कृती निर्माण केली होती, असे सांगत अमिताभनी ब्लॉगवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘चित्रपटात गाणी असावीत की नाही, नाच असावा की नाही या विषयावर अनेकदा वादविवाद झाले आहेत. आणि मी नेहमीच या वादविवादाचा एक भाग राहिलो आहे. मात्र, आपल्याच चित्रपटांवर टीका करताना, त्याचा उपहास करताना कथेतील प्रसंगांना अनुरूप अशी ती गाणी लिहिणे, त्यांना साजेसे संगीत देऊन ते गाऊन घेणे आणि मग त्या गाण्यावर चित्रपटात यथोचित, सुंदर दिसेल असे नृत्य बसवणे यासाठी त्याकाळी त्यांनी जी मेहनत घेतली आहे, प्रयत्न केले आहेत ते एका क्षणात आपण खोटे पाडतो हे आपल्या मंडळींच्या लक्षात का येत नाही..’, असा उद्विग्न सवालही अमिताभ यांनी केला आहे.
चित्रपटात नाचगाणी असावीत का?, असायलाच हवीत. त्यात काय? मी नायक म्हणून तुमच्या डोक्यावर तर नाचत नाहीत ना. मग झाडाभोवती फिरत गाताना-नाचताना दाखवत असतील तर काय अडचण आहे, असे म्हणणाऱ्या अमिताभ यांनी टीकाकारांना हा प्रयोग एकदा तरी क रून पहा, असे आव्हान दिले आहे. ‘आजूबाजूचे सगळे विश्व हे चित्रपटातील काल्पनिक, फिल्मी आहे हे माहित असतानाही ते गाणे, त्याचे संगीत, त्याचे शब्द जाणून घेऊन तशा भावना चेहऱ्यावरू व्यक्त करायचा प्रयत्न करून पहा म्हणजे लक्षात येईल की काय अवस्था होते’, असे खमके आव्हान बिग बीने आपल्या ब्लॉगवरून केले आहे.

Story img Loader