दिग्दर्शक आर बल्की आणि अमिताभ बच्चन ही जोडी आपण बऱ्याचदा एकत्र पाहिली आहे. असं म्हंटलं जातं की बल्की यांना अमिताभ यांच्याबरोबर काम करायचं होतं म्हणूनच त्यांनी ‘चीनी कम’सारखा चित्रपट लिहिला. त्यानंतर ‘पा’ या चित्रपटातसुद्धा आपण या दोघांनी केलेली कमाल अनुभवली आहे. आता बल्की यांच्या आगामी ‘चूप’ या चित्रपटातसुद्धा अमिताभ बच्चन यांचा सहभाग असणार आहे. पण अभिनेता म्हणून नव्हे तर यावेळी बच्चन यांचं नाव पडद्यावर चक्क संगीत संयोजक म्हणून झळकणार आहे.
याविषयी खुद्द आर. बल्की यांनीच खुलासा केला आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, “खरंतर ही गोष्ट जाणूबुजून घडवून आणलेली नाही. मी बच्चनजींना माझा आगामी ‘चूप’ हा चित्रपट बघण्याची विनंती केली. त्यांनी तो पाहिला आणि पाहून झाल्यावर त्यांनी मला बोलावलं आणि त्यांच्याकडच्या पियानोवर एक धून वाजवून दाखवली. हा चित्रपट पाहिल्यावर ही धून त्यांच्या मनात आली असं त्यांनी सांगितलं. ती धून माझ्या काळजाला स्पर्श करून गेली. मी त्यांना ती धून चित्रपटात वापरण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी आनंदाने होकार दिला. आज याच चित्रपटाच्या निमित्ताने अमितजी यांचं नाव मोठ्या पडद्यावर प्रथमच संगीत संयोजक (म्युझिक कंपोजर) म्हणून झळकणार आहे.”
आणखी वाचा : कार्तिक – कियाराची जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार, मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
अमिताभ बच्चन यांनी वाजवलेली ती धून चित्रपटात वापरली जाणार असून संगीत दिग्दर्शनाची धुरा अमित त्रिवेदि, स्नेहा खानवलकर यांच्यावर आहे. ‘चूप’ या चित्रपटाच्या टीझरची चांगलीच चर्चा झाली. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर पठडीतला चित्रपट असून प्रेक्षक याची फार आतुरतेने वाट पाहत आहेत. बल्की यांच्याबरोबरीनेच शेअर मार्केटमधलं एक मोठं व्यक्तिमत्व दिवंगत राकेश झुनझुनवाला हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमान, सनी देओल, श्रेया धन्वंतरी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सनी देओल बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर स्कॅम १९९२ च्या यशानंतर श्रेयादेखील वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. २३ सप्टेंबरला ‘चूप’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.