‘शमिताभ’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बुधवारी अहमदाबादमध्ये आलेले बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याचा भरपूर आनंद लुटला. महानायकाची एक झलक पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी तुफान गर्दी केली होती. एका इमारतीच्या गच्चीवर जाऊन पतंग उडविणाऱ्या बिग बींना पतंग उडवताना खूप कष्ट घ्यावे लागले. परंतु बऱ्याच परिश्रमानंतर त्यांची पतंग आकाशात उडू लागली. बिग बींची पतंग आकाशात झेपावताच परिसरात एकच जल्लोष उडाला. यावेळी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर चित्रपटातील अन्य कलाकार अक्षरा हसन आणि धनुषदेखील उपस्थित होते. काही काळ पतंग उडविण्याचा आनंद घेतल्यानंतर अमिताभ पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. बच्चन यांनी शहरवासियांना टि्वटरच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. आर. बाल्की दिग्दर्शित ‘शमिताभ’ चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan flies kite in ahmedabad