भारतात बॉलिवूड कलाकारांच्या छोट्या-छोट्या गोष्टींची खबर ठेवण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यासाठी ते आपल्या मनपसंद स्टार्सच्या सतत संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात असतात. सध्याच्या इंटरनेट आणि माहितीच्या युगात टि्वटर आणि फेसबुकसारख्या सोशल साईटमुळे तर हे अधिकच सोपे झाले आहे. अशा साईटवर कोणाचा किती चाहता वर्ग आहे, त्यावरून त्या सेलिब्रिटीचं महत्व अधोरेखित होतं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमधील आपल्या सहकलाकारांना मागे सारत टि्वटरवर ८० लाख चाहत्यांचा पल्ला गाठला आहे. टि्वटर या सोशल मीडिया साईटवर अमिताभ बच्चन यांचे ८० लाख चाहते त्यांना फॉलो करतात. खुद्द अमिताभ बच्चनसुद्धा चाहत्यांच्या या प्रेमाने भारावून गेले आहेत. तुमच्यामुळेच हे शक्य झाले असून, हा तुमचाच विजय असल्याचे म्हणत अमिताभ बच्चन यांनी टि्वटरवर चाहत्यांचे आभार मानले आहेत. अमिताभ बच्चन यांनी टि्वटरवर शाहरूख खान (६७.८ लाख फॉलोअर्स), हृतिक रोशन (५०.८ लाख फॉलोअर्स) या आपल्या सहकलाकारांना सहज मागे टाकले आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडी, शुटिंगबाबतचे किस्से आणि चालू घडामेडी याबाबतचे संदेश अमिताभ टि्वटरवर सतत पोस्ट करत असतात. याशिवाय ते त्यांच्या ब्लॉगवरसुद्धा सातत्याने लिहित असतात.

Story img Loader