छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ने काही दिवसांपूर्वी एक हजार एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आहे. २००० सालामध्ये सुरु झालेल्या या शोचा सध्या १३वा सिझन सुरु आहे. या शोच्या एक हजार एपिसोड पूर्ण करण्याच्या निमित्ताने शोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेली नंदाने हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शोच्या इतिहासासह त्यांचाही सिनेसृष्टीतील प्रवासाच्या आठवणी ताज्या केल्या. त्यावेळी ते भावूक झाले.

‘कौन बनेगा करोडपती १३’ व्या सिझनमध्ये अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेली नंदाने हजेरी लावली होती. यावेळी श्वेता बच्चन हिने बिग बींना प्रश्न विचारला. हा तुमचा १००० वा भाग आहे, मग तुम्हाला कसे वाटते? असे तिने विचारले. मुलीच्या प्रश्नाला उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “या शो चा प्रवास मला चित्रपटात काम मिळत नसताना सुरु झाला.”

हेही वाचा : अखेर तक्रारारीनंतर ‘KBC 13’ च्या एपिसोडमधील ‘तो’ वादग्रस्त सीन हटवला

“२००० मध्ये या शो ची सुरुवात झाली. आता हा शो सुरु होऊन २१ वर्षे झाली आहेत. त्यावेळी अनेकांनी मला सांगितले की तुम्ही मोठ्या पडद्यावरुन छोट्या पडद्यावर जाताय. यामुळे तुमच्या प्रतिमेला फटका बसेल, असे अनेकांनी म्हटले. मात्र माझी स्वत:ची परिस्थिती फार वेगळी होती. मला चित्रपटात काम मिळत नव्हते. मात्र या शो चा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यामुळे पूर्ण जग पलटल्यासारखे वाटते.” असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

यापुढे अमिताभ बच्चन म्हणाले, “पण या दरम्यान मला आवडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आतापर्यंत आलेल्या सर्व स्पर्धकांकडून मला रोज काहीतरी शिकायला मिळाले. दरम्यान हे सर्व बोलताना बिग बी भावूक झाले. तर जया बच्चन या फार शांत बसलेल्या होत्या. यानंतर बिग बींनी जया बच्चन यांच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवली.

सोनी टीव्हीने शेअर केलेल्या या व्हिडीओत ‘कौन बनेगा करोडपती’ शोचा २१ वर्षांचा प्रवास आणि या प्रवासातील खास क्षण दाखवण्यात आले आहेत. हा शाक भाग शुक्रवारी प्रसारित होणार आहे. तर या भागात बिग बी मुलगी श्वेता आणि नात नव्यासोबत खेळाची मजा लुटताना दिसतील.

Story img Loader