कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा पुढील महिन्यात प्रेयसी गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतीच कपिलनं बिग बींच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात उपस्थिती लावली. एका स्वयंसेवी संस्थेला मदत करण्यासाठी कपिल या शोमध्ये सहभागी झाला होता. विशेष म्हणजे या शोमध्ये कपिलला शुभेच्छा देत बिग बींनी त्याला सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्रही दिला आहे.
प्रेयसी गिन्नीसोबत कपिल डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. यासाठी बच्चन यांनी कपिलला खूप शुभेच्छा दिल्या. या शोमध्ये कपिलनं बिग बींना सुखी संसाराचा कानमंत्र विचारला. कपिलच्या प्रश्नानं एकच हाशा पिकला. सुखी वैवाहिक जीवन जगायचं असेल तर ‘सॉरी’ हा शब्द सतत तुमच्या तोंडात असला पाहिजे. काहीही झालं तरी बायकोला सॉरी बोलत राहा. जेव्हा दोघांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होताना लक्षात येईल त्याक्षणी बायकोला सॉरी म्हणून टाका. हा एक शब्द तुम्हाला खूप मदत करू शकतो’ असा कानमंत्र बच्चन यांनी कपिलला दिला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात कपिलनं सर्वांसमोर बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांना लग्नासाठी आग्रहाचं आमंत्रण देखील दिलं. कपिलचं आमंत्रण स्वीकारत बच्चन यांनी लग्नाला येण्याचं कबूल केलं आहे. १२ डिसेंबरला अमृतसरमध्ये कपिल विवाहबंधनात अडकणार आहे.