बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ चित्रपट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा नागपूर येथील क्रिडा शिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण हे नागपूरमध्ये झालं आहे. चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. मात्र जेव्हा त्यांना या चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं तेव्हा मात्र ते या चित्रपटासाठी तयार नव्हते. मात्र नंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यानं अमिताभ यांना या चित्रपटासाठी तयार केलं होतं.
अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट साइन करण्यापूर्वीच किस्सा नुकताच एका मुलाखतीत सांगितला. जेव्हा त्यांच्याकडे या चित्रपटाचा प्रस्ताव बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यानं ठेवला तेव्हा ते या चित्रपटाला नकार देऊ शकले नाहीत असं त्यांनी यावेळी सांगितलं. या अभिनेत्यानं अमिताभ यांच्यासमोर केवळ चित्रपटाचा प्रस्तावच ठेवला नाही तर त्यानं अमिताभ यांना या चित्रपटासाठी तयारही केलं. हा प्रसिद्ध अभिनेता होता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान.
आणखी वाचा- Video- जेव्हा ६ वर्षांनंतर आर्ची- परश्यानं ‘सैराट’चा ‘तो’ सीन केला रिक्रिएट, व्हिडीओ एकदा पाहाच
आमिर खाननं जेव्हा ‘झुंड’ चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा तो एवढा प्रभावित झाला की त्यानं अमिताभ बच्चन यांना घेऊन हा चित्रपट बनवण्याचा सल्ला नागराज मंजुळे यांना दिला होता. या चित्रपटासाठी अमिताभ यांच्यापेक्षा उत्तम कोणीच असू शकणार नाही असं आमिरला वाटलं होतं. याबाबत बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘मला आठवतं जेव्हा मी आमिरसोबत या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चर्चा केली तेव्हा त्यानं मला सांगितलं की, मी हा चित्रपट करायलाच हवा आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला विचारतो किंवा एखादा सल्ला देतो तेव्हा काय काय होतं हे तुम्हाला माहीतच आहे. त्याच्याशी बोलल्यावर मी चित्रपटाला नाही म्हणूच शकलो नाही.’
आणखी वाचा- Video: भर रस्त्यात काजोल आणि करीना गाडीतून उतरल्या अन्…
दरम्यान जेव्हा आमिर खाननं पहिल्यांदा ‘झुंड’ चित्रपट पाहिला तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले होते. चित्रपटाबाबत त्यानं अतिशय भावूक प्रतिक्रिया दिली होती. “चित्रपट पाहून मी नि:शब्द झालोय. तुम्ही भारतीय मुलामुलींच्या भावनांना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवलंय, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. चित्रपटात मुलांनी तर अप्रतिम अभिनय केला आहे. चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं ते कमी आहे. हा चित्रपट पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. आम्ही २०-३० वर्षात जे शिकलो त्याचा तर तुम्ही फुटबॉल केला” असं तो म्हणाला. याशिवाय त्यानं भविष्यात नागराज मंजुळे यांच्यासोबत मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.