देशात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशात आता बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यात करोनाचा शिरकाव झाल्याची माहिती मिळत आहे. जलसा बंगल्यावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे.

अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावरील कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याची माहिती अमिताभ यांनी त्याच्या ब्लॉगवरून दिली आहे. मात्र कोणाला करोनाची लागण झाली आहे याची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. ‘घरातील करोनाच्या परिस्थितीशी लढत आहे. तुमच्या सर्वांशी काही काळानंतर भेट होईल.’ असं त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या तब्बल ३१ कर्मचाऱ्यांची रविवारी करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एका कर्मचाऱ्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांना २०२० साली करोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही काळासाठी त्यांना रुग्णालयातही भरती करण्यात आलं होतं.

२०२० मध्ये केवळ अमिताभ बच्चनच नाही तर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या पूर्ण कुटुंबीची करोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये श्वेता बच्चन, जया बच्चन आणि नातू अगस्त्य वगळता इतरांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.