चित्रपटसृष्टीचे थलाईवा रजनीकांत लवकरच ‘जय भीम’ चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन देखील दिसणार असल्याची चर्चा गेले बरेच दिवस सोशल मीडियावर सुरू होती. तब्बल ३२ वर्षांनी हे दोन मेगास्टार एकत्र दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.
अखेर ही बातमी खरी ठरली आहे. दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या आगामी ‘थलाईवर १७०’ या चित्रपटात रजनीकांतसह, राणा डग्गूबाती, फहाद फाजील दिसणार असल्याचं स्पष्ट झालं. आता या चित्रपटाशी बॉलिवूडच्या महानायकाचं नावही जोडलं गेलं आहे. रजनीकांत यांच्या १७० व्या चित्रपटात अमिताभ बच्चनसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
आणखी वाचा : दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा अभिनय थांबवणार? अभिनेत्रीचा जुना व्हिडीओ व्हायरल
नुकतंच चित्रपटाचे निर्माते लायका प्रोडक्शनने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अमिताभ बच्चनदेखील चित्रपटाशी जोडल्याची बातमी शेयर केली आहे. टीजे ज्ञानवेल यांचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये रजनीकांत मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. अमिताभ आणि रजनीकांत यांनी ‘हम तुम’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अंधा कानून’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
यामुळेच रजनीकांत यांचा हा १७० वा चित्रपट फारच खास ठरणार आहे. या चित्रपटाचं संगीत ‘जवान’चा संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रवीचंदरचं असणार आहे. नुकताच रजनीकांत यांच्या ‘जेलर’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता त्यांचा ‘लाल सलाम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच रजनीकांत आणि अमिताभ बच्चन हे ३२ वर्षांनी एकत्र येणार असल्याची बातमी ऐकून त्यांचे चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत.