महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती १४’ हा शो सध्या चर्चेत आहे. बिग बींच्या या लोकप्रिय शोला त्यांचा पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. महाराष्ट्रातील एका महिलेनं एक कोटींच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देत मोठी रक्कम जिंकली आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणाऱ्या कविता चावला या ४५ वर्षीय महिलेने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर एक कोटी रुपये आपल्या नावावर केले आहेत. मात्र, कविता यांनी ७ कोटी रुपये जिंकले की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे कविता याआधीही ‘कौन बनेगा करोडपती शो’मध्ये पोहोचल्या होत्या, परंतु त्या हॉटसीटपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या, पण त्यांनी हार मानली नाही आणि त्या जिद्दीने पुन्हा शोमध्ये परतल्या, हॉटसीटवर बसल्या आणि एक कोटी रुपये जिंकल्या.
कविता या दुसऱ्यांदा शोमध्ये सहभागी झाल्या. पहिल्यांदा हॉटसीटवर न पोहोचू शकलेल्या कविता दुसऱ्यांदा शोमध्ये पोहोचल्यावर सीझनच्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत. कविता या त्यांचा मुलगा विवेकबरोबर शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. कविता करोडपती झाल्या तो एपिसोड येत्या सोमवार आणि मंगळवारी सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
‘तारक मेहता…’मध्ये दिशा वकाणी परतणार की नवी अभिनेत्री येणार? निर्मात्यांनी दिली महत्वाची माहिती
‘कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. मागील सीझनपासून यामध्ये महिलांचा बोलबाला आहे. गेल्या सीझनमध्ये अनेक महिला करोडपती झाल्या आहेत. करोडपती होण्याचे स्वप्न घेऊन देशभरातील चाहते या शोमध्ये सहभागी होतात. शोमध्ये येणाऱ्या प्रत्येकालाच मोठी रक्कम जिंकता येते, असं नाही. परंतु स्पर्धक लाखो रुपये जिंकण्याचा आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.