‘गोलमाल’, ‘सिंघम’ आणि नंतर थेट ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने धडाडत तिकीटबारीवर कमाल दाखवणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या अॅक्शन आणि विनोदी स्वभावाच्या अफलातून रसायनामुळे लोकप्रिय ठरला आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशानंतर आपल्या अॅक्शनची जादू रिअॅलिटी शोच्या माध्यमातून दाखवण्याची संधी रोहितकडे चालून आली आहे. त्याच्या या छोटय़ा पडद्यावरच्या जबरदस्त अॅक्शन प्रवेशासाठी खुद्द अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज दिला आहे. ‘१४-०३-१९७४ के दिन एक बहुत ही होशियार, होनहार, समझदार और धमाकेदार बच्चे का जन्म हुआ..’ अशा शब्दांत रोहित शेट्टी नावाचा छोटा बच्चा अॅक्शनपटांचा धमाकेदार दिग्दर्शक कसा झाला?, याची कथा अमिताभ यांनी आपल्या खास आवाजात लोकांना ऐकवली आहे. विनोदी चित्रपटांमध्ये अॅक्शन हा काहीसा विचित्र प्रकार रोहितने आपल्या चित्रपटांमधून लोकप्रिय केला. त्यामुळे एकीकडे त्याच्या विनोदी चित्रपट मालिकांनी बॉलीवूडवर आपली हुकूमत गाजवली असली तरी त्याच्यातले अॅक्शनपटांचे कौशल्य कधीच मागे पडले नाही. रोहितच्या याच करामतींमुळे तो बॉलीवूडजनांमध्ये लोकप्रिय आहे.याच रोहित शेट्टीच्या ‘बोलबच्चन’मुळे अभिषेक बच्चनची अभिनयाची डुबती नौका तीराला लावली हे अमिताभही विसरलेले नाहीत. किंबहुना, या चित्रपटामुळे अभिषेकला सवरेत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाल्यानंतर तर बिग बींचे मन भरून आले. तेव्हापासून रोहितच्या प्रेमात असलेल्या अमिताभ बच्चन यांनी त्याच्या या छोटय़ा पडद्यावरच्या नाटय़मय प्रवेशासाठी खुशी खुशी आपला आवाज दिला आहे. बिग बींचा आवाज आणि त्यावर रोहितचा बिग अॅक्शनमध्ये झालेला प्रवेश त्याला मोठय़ा पडद्याप्रमाणेच छोटय़ा पडद्यावरही ‘खतरों का खिलाडी’ म्हणून लोकप्रियता मिळवून देईल, अशी आशा करूयात.

Story img Loader