पायलिन महाचक्रीवादळाच्या झंझावातामध्ये फसलेल्या आंध्र आणि ओडिशा येथील नागरिकांच्या सुखरुपतेसाठी बॉलीवूडकरांनी देवाजवळ प्रार्थना केली. महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता अक्षय कुमार तसेच इतर कलाकारांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रार्थना केली.



उत्तम आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने भारताने मोठी जीवितहानी टाळली असली तरी, या वादळाचा नऊ लाख नागरिकांना फटका बसला आहे. तसेच करोडोंची वित्तहानीही झाली आहे. त्यामुळे या वादळाने आता शमावे यासाठी अवघा देश देवाजवळ प्रार्थना करत आहे.

आताच्या चक्रीवादळासाठी हवामान विभाग चार दिवस आधी नेमका अंदाज देऊ शकला. विशेष म्हणजे चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग किती असेल व ते चार दिवसांनंतर किनाऱ्यावर कोणत्या ठिकाणी धडकेल, हे अंदाज बरोबर ठरले. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनाला पुरेसा वेळ मिळाला.