‘शमिताभ’ चित्रपटाच्या संगीत अनावरण कार्यक्रमादरम्यान इलायाराजा यांनी संगीतकार म्हणून एक हजार चित्रपटांना संगीत दिल्यानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्रीदेवी, कमल हसन, सुपरस्टार रजनिकांत आणि महानायक अमिताभ बच्चन उपस्थित होते. शमिताभ चित्रपटाच्या कलाकारांच्या उपस्थितीत इलायाराजा यांचा सत्कार करण्यात आला. अन्य गायक आणि संगीतकारांच्या जोडीला अमिताभ बच्चन आणि धनुषने आपली अदाकारी सादर केली. आपण इलायाराजा यांचे फार मोठे चाहते असल्याचे सांगत चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल धनुषने त्यांचे आभार मानले. तो पुढे म्हणाला, मी अभिनयाचे शास्त्रशुद्ध धडे गिरवले नसून, केवळ योगायोगाने अभिनेता झालो. इलायाराजा यांच्या संगीतामुळेच आत्तापर्यंत अभिनेता म्हणून आपला प्रवास शक्य झाला असून, त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते.  संगीतकार म्हणून ‘शमिताभ’ हा इलायाराजा यांचा हजारावा चित्रपट नसून, दिग्दर्शक बाला यांचा चित्रपट हजारावा असल्याचा खुलासा दिग्दर्शक आर. बालकी यांनी केला. कार्यक्रमाला ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन, श्रृती हसन आणि तब्बूदेखील उपस्थित होते. मंचावर उपस्थित अमिताभ बच्चन, रजनिकांत आणि कमल हसन यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रख्यात संगीतकार इलायाराजा यांच्याबरोबरचा आपला कामाचा अनुभव कथन केला.

Story img Loader