अमिताभ बच्चन आणि रेखा या हीट जोडीला अनेक वर्षांनी पडद्यावर एकत्र पहायला मिळणार असल्यामुळे आर.बाल्की दिग्दर्शित ‘शमिताभ’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आम्ही दोघांनी प्रत्यक्षात एकत्रित चित्रीकरण केलेले नाही, असे सांगत अमिताभ यांनी चाहत्यांचा काहीसा हिरमोड केला. आमच्यावरील दृश्ये वेगवेगळी चित्रित झाली असली तरी, ती विशिष्ट क्रमवारीत एकत्र आणली असल्याचे चित्रपट पाहताना तुमच्या लक्षात येईल. मात्र, रेखासारखी व्यक्ती चित्रपटात असणे आमच्यासाठी भाग्याची बाब असल्याचे अमिताभ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आर.बाल्की आम्हा दोघांना घेऊन एक चित्रपट करायचे म्हणत होता. अन्य कोणाबरोबर हा योग जुळून आल्यास तसा विचार करण्यास काही हरकत नाही, असेही अमिताभ यांनी सांगितले. या चित्रपटातील माझे संपूर्ण संवाद प्रत्यक्ष चित्रीकरणाअगोदरच रेकॉर्ड करण्यात आले होते. त्यामुळे चित्रीकरण सुरू असताना याच रेकॉर्डिंगसचा आणि अगोदर चित्रित केलेल्या दृश्यांचा वापर केला जात असे. चित्रीकरणादरम्यान, फक्त मी सांगतो तसे करा, असे बाल्की मला वारंवार सांगत असे. मी यापूर्वी कधीही अशाप्रकरे काम केलेले नाही. या सगळ्याचे श्रेय आर.बाल्कीला जात असल्याचे अमिताभ यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा