बॉलीवूडची सर्वात प्रसिद्ध जोडी अमिताभ-रेखा लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकण्याची शक्यता आहे. अनिस बाझमीच्या ‘वेलकम बॅक’ या हास्य चित्रपटात ही दिग्गज जोडी एकत्र दिसणार आहे. २००७साली प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ चित्रपटाचा ‘वेलकम बॅक’ हा सिक्वल आहे.
अमिताभ या चित्रपटात फिरोज खान यांनी केलेली आरडीएक्स या डॉनची भूमिका साकारणार आहेत. मात्र, रेखा यांच्या भूमिकेबाबत तसेच चित्रपटात त्या काम करणार की नाही, याबाबत कोणताच निर्णय घेण्यात न आल्याचे बाझमी यांनी सांगितले आहे. तसेच, बाझमी हे रेखाजींचे चाहते असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. नाना पाटेकर आणि अनिल कपूर वेलकम बॅकमध्ये त्यांच्या भूमिकांची पुनरावृत्ती करणार असून जॉन आणि श्रृती हसनलाही चित्रपटात घेण्यात आले आहे.
अमिताभ-रेखा यांच्या जोडीने ‘दो अनजाने’ (१९७६)मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांनी ‘मुक्कदर का सिकंदर’ (१९७८), ‘मि.नटवरलाल’ (१९७९), ‘सुहाग’ (१९७९), ‘सिलसिला’ (१९८१) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, काही वर्षांपासून वैयक्तिक कारणांमुळे दुरावलेली ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसण्याची आशा आहे. या दोघांच्याही चाहत्यांसाठी त्यांना एकत्र पाहणे पर्वणी असेल.

Story img Loader