बॉलीवूडची सर्वात प्रसिद्ध जोडी अमिताभ-रेखा लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकण्याची शक्यता आहे. यापूर्वी यश चोप्रांच्या १९८१ साली आलेल्या ‘सिलसिला’ या चित्रपटात अमिताभ आणि रेखा एकत्र दिसले होते. मात्र, आता आर.बाल्कीच्या ‘शमिताभ’ या चित्रपटात हे दोघेजण एकत्र येण्याचा चमत्कार पहायला मिळू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांना तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा या दोघांना एकत्र पहायला मिळण्याची शक्यता आहे. तामिळ सुपरस्टार आर.धनुष या चित्रपटात एका मुकबधिराची भूमिका साकारणार असून, त्याने नुकतेच रेखा यांच्याबरोबरचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. मात्र, ‘शमिताभ’मध्ये अमिताभ आणि रेखा यांची एकत्रित दृश्ये चित्रित केली जाणार की नाही, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
अमिताभ-रेखा यांच्या जोडीने ‘दो अनजाने’ (१९७६)मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांनी ‘मुक्कदर का सिकंदर’ (१९७८), ‘मि.नटवरलाल’ (१९७९), ‘सुहाग’ (१९७९), ‘सिलसिला’ (१९८१) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, काही वर्षांपासून वैयक्तिक कारणांमुळे दुरावलेली ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसण्याची आशा आहे. या दोघांच्याही चाहत्यांसाठी त्यांना एकत्र पाहणे पर्वणी असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा