लग्नाच्या ४० व्या वाढदिवशी हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. याबद्दल अमिताभ म्हणतो,  एका संध्याकाळची ही गोष्ट आहे, जेव्हा मी आणि जयाने साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
७० वर्षीय बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, आज ३ जून २०१३… आमच्या लग्नाला ४० वर्ष पूर्ण झालीत. जया आणि मी ४० वर्षांपासून लग्नाच्या बंधनात असून, ही एक आयुष्यभराची साथ आहे.
जून १९७३ मध्ये अमिताभ आणि जया यांचा विवाह झाला. अमिताभ बच्चन यांनी देवाचे आभार मानले असून, देवाच्याच कृपेमुळे त्यांना एक मोठे आणि प्रेमळ कुटुंब मिळाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अमिताभ पुढे लिहितात, एका सर्वसाधारण संध्याकाळी आपल्या आईबरोबर ते मुंबईतील मलाबार हिल्स येथे गेले आणि कुठलाही गाजावाजा आणि डामडौल न करता कुटुंबीय, काही मित्र आणि  माध्यमांमधील मोजक्याच जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पडले.
‘जंजीर’ चित्रपट यशस्वी झाल्यास लग्न करण्याचे वचन आम्ही चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान  एकमेकांना दिले होते आणि आज आमच्या कुटुंबात दोन मुल,  तीन नातवंड, जावई, सून, नातेवाईक आणि व्याही असल्याचे त्यांनी ब्लॉगवर लिहिले आहे.
जयाने पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर १९७२ मध्ये ‘बंसी बिरजू’ या चित्रपटात काम केले होते आणि याच वर्षी बी. आर. इशारा यांच्या ‘एक नजर’ या चित्रपटातदेखील ती दिसली होती. यानंतर अमिताभ आणि जयाने ‘जंजीर’ मध्ये एकत्र काम केले आणि चित्रपट यशस्वी झाल्यास लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या जोडीने  ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’ आणि ‘शोले’ सारख्या चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा