महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ शोचे १६वे पर्व होस्ट करत आहेत. यामध्ये ते स्पर्धकांशी गप्पा मारताना अनेक खुलासे करतात. आता नुकतेच त्यांनी त्यांची नात आराध्या बच्चन नाराज होते तेव्हा ते काय करतात, याबद्दल माहिती दिली. शोमध्ये एका स्पर्धकाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बिग बी यांनी याबद्दल खुलासा केलाय.
वैष्णवी नावाची एक स्पर्धक केबीसीच्या हॉटसीटवर पोहोचली. त्यावेळी अमिताभ यांनी प्रेक्षकांना सांगितले की वैष्णवी एक रिपोर्टर आहे. तेव्हा वैष्णवीने तिची बिग बींची मुलाखत घेण्याची इच्छा बोलून दाखवली. यावेळी तिने विचारलं की तुम्ही चित्रपट आणि शोच्या शुटिंगमध्ये व्यग्र असता, मग तुमची नात आराध्याबरोबर वेळ केव्हा घालवता. तेव्हा अमिताभ म्हणाले, “हो, मी तिच्याबरोबर जास्त वेळ घालवू शकत नाही. मी सकाळी ७-७.३० च्या सुमारास निघतो आणि ती सकाळी ८ वाजता शाळेत जाते. ती दुपारी ३-४ नंतर परत येते आणि मग तिला तिचा होमवर्क पूर्ण करायचा असतो. तिची आई (ऐश्वर्या राय बच्चन) तिला तिचा अभ्यास पूर्ण करण्यास मदत करते. मी रात्री १०-११ च्या सुमारास घरी परततो. तोपर्यंत ती झोपलेली असेल.”
“खरं तर तंत्रज्ञानाचे धन्यवाद, कारण आम्ही आम्ही फेसटाइमद्वारे एकमेकांशी कनेक्टेड राहतो. रविवारी तिची शाळा नसते आणि त्यादिवशी मला वेळ मिळाला तर मी तिच्याशी काही वेळ खेळतो. जेव्हा ती माझ्यावर रागावते किंवा नाराज होते तेव्हा मी तिला चॉकलेट्स गिफ्ट करतो. आणि मुली त्यांच्या केसांमध्ये काय घालतात? बँड्स. जेव्हा आराध्या नाराज होते, तेव्हा गुलाबी तिचा आवडता रंग आहे म्हणून मी तिला गुलाबी हेअर बँड आणि क्लिप गिफ्ट करतो आणि ती खूश होते,” असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.