अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला पठाण हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून नवा वाद रंगला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घाललेल्या भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यामुळे या वादाला तोंड फुटलं आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. याविरोधात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं आहे. या दरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी भाष्य केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी नुकतंच कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यंदा कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २८ वे वर्ष आहे. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना सन्मानित केले. या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या विकासापासून ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत भाष्य केले.
आणखी वाचा : Kiff 2022 : आधी पाया पडला, मग मिठी मारली अन्…; अमिताभ – शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल
या महोत्सवात अमिताभ बच्चन यांनी ब्रिटीश सेन्सॉरशिप, स्वातंत्र्यपूर्व काळातील चित्रपट, जातीयवाद आणि सामाजिक ऐक्याविषयी सविस्तरपणे भाष्य केले.यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले, “मला खात्री आहे की या व्यासपीठावर असलेले माझे सर्व सहकारी मान्य करतील की आताही नागरी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.”
“सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंत विषयांमध्ये बराच बदल झाला आहे. आता अनेक विषय उपलब्ध आहेत. या सर्वच विषयांवर प्रेक्षक हे सिंगल स्क्रीन आणि ओटीटीच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक विषयांवर त्यांची मत मांडत असतात. त्यामुळे आपण प्रेक्षकांना गृहीत धरु शकत नाही.
आपण प्रेक्षकांना गृहीत धरणे चुकीचे असते. आज प्रेक्षकांकडे विविध विषय सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना काय पाहायचे, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायचे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. त्याची निवड ते करु शकतात”, असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटले.
दरम्यान शाहरुखच्या पठाणवरून वाद सुरू असतानाच बिग बींनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे ही त्या वादावर अप्रत्यक्ष टिप्पणी असल्याचं म्हटलं जातंय. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.