अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. प्रशांत दामले यांनी काल (६ नोव्हेंबर) त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला. या नाट्यप्रयोगानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेते अमिताभ बच्चन हे कायमच ट्विटरवर सक्रीय असतात. प्रशांत दामलेंच्या १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोगानिमित्त अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी प्रशांत दामलेंचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो प्रशांत दामलेंच्या एका लग्नाची गोष्ट या नाटकाच्या १००० व्या प्रयोगादरम्यानचा आहे.
आणखी वाचा : “मुलगी होण्यापेक्षा…” आलिया भट्टच्या पोस्टनंतर अक्षय कुमारचा रणबीर कपूरला सल्ला
“प्रशांत दामले यांचा 12,500 प्रयोगांचा विक्रम आज होतो आहे. 39 वर्षांत एवढे प्रयोग करणं ही कौतुकाची गोष्ट आहे! मी ‘एका लग्नाची गोष्ट’ या 1000 व्या प्रयोगाला गेलो होतो.. आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना हार्दिक शुभेच्छा!” असे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.
अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर प्रशांत दामले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “महानायकाकडून शुभेच्छा! खूप खूप आभारी आहे, अमितजी!” अशी प्रतिक्रिया प्रशांत दामलेंनी दिली आहे.
आणखी वाचा : “मी पोहोचलो आहे..” १२,५०० व्या विक्रमी नाट्यप्रयोगानिमित्त प्रशांत दामलेंनी केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचा हा प्रयोग सायनमधील श्री ष्णमुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे संपन्न झाला. या नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र काम करत आहे. त्यांनी नाटकांसह काही चित्रपटांमध्येही काम केले होते. या दोघांव्यतिरिक्त या नाटकामध्ये अतुल तोडणकर, प्रतीक्षा शिवणकर, मृणाल चेंबूरकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे हे कलाकार काम करत आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.