अमिताभ बच्चन हे व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहेत. चित्रपटांपासून ते जाहिरातींपर्यंत ते सतत काम करत असतात. याशिवाय ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या प्रत्येक सीझनला होस्ट करताना दिसतात. ७९ वर्षीय अमिताभ बच्चन यांची ही ऊर्जा आणि कामाबद्दलचे प्रेम पाहून आजच्या कलाकारांनाही आश्चर्य वाटते. दरम्यान, अमिताभ यांनी एका पोस्टमध्ये त्यांचेही काम थांबले असल्याचे म्हटले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम सर्वांच्या कामावर झाला आहे. मुंबईतही काही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्याठिकाणी शूटिंग सुरू आहे, तेथे सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. अमिताभ यांनी पोस्ट लिहून याचेच संकेत दिले आहेत.
अमिताभ यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांचा चष्मा आणि वाढलेली दाढी हे फोटोतील ठळक मुद्दे आहेत. यामध्ये ते हसत आहेत. यासोबत त्यांनी ‘काम सगळं बंद आहे. नुसती दाढी वाढत आहे,’ असे म्हटले आहे. त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट होते की, करोनामुळे ते सध्या घरीच आहे आणि त्याचे शूटिंग थांबले आहे.
“अनावधानाने चूक झाली”, अमिताभ बच्चन यांनी मागितली सचिन तेंडुलकरची माफी; जाणून घ्या कारण
मात्र अमिताभ बच्चन यांच्याकडे कामाची कमतरता नाही. येत्या काळात त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण या कठीण काळात प्रत्येकाच्या कामावर नक्कीच परिणाम झाला आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ शो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संपला होता. त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे तर, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबतचा ‘ब्रह्मास्त्र’ या वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अजय देवगणसोबत ‘रनवे ३४’ आहे. अमिताभ यांचा ‘झुंड’ खूप दिवसांपासून तयार आहे. ‘गुडबाय’ चित्रपटात अमिताभसोबत नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्ना दिसणार आहेत. यासोबतच दीपिका पदुकोणसोबतचा ‘द इंटर्न’ हा चित्रपटही चर्चेत आहे.