‘पा’, ‘चीनी कम’सारख्या चित्रपटानंतर आर. बाल्की आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकत्र येणार म्हटल्यावर चित्रपटाची चर्चा होणे साहजिकच होते. मात्र, या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली तरी बाल्कीने त्यासंबंधीचे काहीही तपशील सांगितले नव्हते. ‘रांझना’च्या यशानंतर धनुष आणि अमिताभ बच्चन अशी वेगळची जोडी घेऊन बाल्कीने आपल्या नव्या चित्रपटाची सुरुवात केली असून ‘शमिताभ’ असे या चित्रपटाचे नाव असल्याचेही त्यांनी जाहीर के ले आहे.
बाल्कीचा हा चित्रपट चर्चेत असण्याची कारणेही तशीच आहेत. मुळात आधीच्या दोन चित्रपटांमध्ये बाल्कीने अमिताभला ‘न भूतो’ अशा वेगळ्या रूपात यशस्वीपणे सादर केले होते. त्यामुळे या चित्रपटात बाल्की आपल्याला नेमकी काय भूमिका देतो आहे, याबद्दल खुद्द अमिताभलाही उत्सुकता होती आणि ब्लॉगवर ती व्यक्तही झाली होती. अगदी चित्रिकरणाची सुरुवात करत असतानाही आपण थोडेसे उदास असल्याचे अमिताभ यांनी म्हटले होते. धनुषसारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता पहिल्यांदाच अमिताभ यांच्याबरोबर काम करणार आहे. शिवाय, अभिनेता कमल हसन यांची दुसरी मुलगी अक्षराही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.
आपल्या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये असलेली उत्सुकता बाल्कीला चांगलीच माहिती आहे. तरीही या चित्रपटाचे नाव जाहीर करून झाल्यावर बाकी नंतर बोलू सावकाश.. असा पवित्रा घेत त्याने चित्रपटातली खरी गंमत दडवून ठेवली आहे. ‘माझ्या चित्रपटाचे चित्रिकरण अर्धे पार पडले आहे. ‘शमिताभ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. म्हणजे अमिताभ यांच्या नावापुढे फक्त ‘श’ लावला आहे. तो का लावला आहे, त्याचा अर्थ काय वगैरे सगळे नंतर बोलूच आपण.. सध्या तरी मी अमिताभ यांची भूमिकेमागची तळमळ, धनुषची बुध्दिमत्ता आणि अक्षराचा निरागसपणा.. या सगळ्या गोष्टींचा सुंदर मिलाफ अनुभवतोय.. असे बाल्कीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. चित्रपटाची कथा बाल्कीची आहे, दिग्दर्शनही त्याचेच आहे. शिवाय, ‘नायक’, ‘अग्नि नक्षत्रम’ सारख्या गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम या चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफी करत असून बाल्कीच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच ‘शमिताभ’ला प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार इलय्याराजा यांचे संगीत असणार आहे.
अमिताभ-धनुषचा शमिताभ!
‘पा’, ‘चीनी कम’सारख्या चित्रपटानंतर आर. बाल्की आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकत्र येणार म्हटल्यावर चित्रपटाची चर्चा होणे साहजिकच होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 30-05-2014 at 04:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan to reveal r balkis film title today