योगायोग किती घडावेत आणि ते कसे घडावेत, याची अशी कुठलीच परिमाणं नसतात. मात्र अशा अनेक चांगल्या गोष्टी जेव्हा योगायोगाने एकत्र घडतात तेव्हा ती घटनाच अविस्मरणीय अनुभव होतो. अभिनयाचे शहेनशहा म्हणून नावाजल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात असाच एक सुंदर अनुभव गुंफला गेला आहे. अमिताभ यांच्या समर्थ अभिनयकलेबद्दल कुणाचेही दुमत नाही, पण अनेकांचे प्रेम आहे ते त्यांच्या आवाजावर. अमिताभ यांच्या आवाजाभोवती सिनेमाची कथा गुंफणाऱ्या आर. बाल्कीला आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक किमया साधता आली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखणीतून उतरलेले आपले राष्ट्रगीत रवींद्र निवासात खुद्द अमिताभ यांच्या आवाजात चित्रित करण्यात आलं आहे.
‘षमिताभ’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने संपूर्ण टीम कोलकत्त्यात होती. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक कृतज्ञता म्हणून काही करता यावं अशी या टीमची इच्छा होती. ती इच्छा एका अभूतपूर्व घटनेने पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत राष्ट्रगीताचे स्वर या गीताच्या मूळ लेखकाच्या घरात अशाप्रकारे घुमले नव्हते, मात्र दिग्दर्शक आर. बाल्की आणि जोडीला दिग्दर्शक शूजित सिरकार यांना ही किमया साधता आली आहे. कोलकत्त्याशी सध्या अमिताभ यांचे नाते जुळले आहे ते शूजित सिरकारच्याच ‘पीकू’ चित्रपटामुळे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोलकत्त्यात सुरू असल्याने अमिताभ काही दिवस तिथे वास्तव्यास होते. आता ‘षमिताभ’च्या प्रसिद्धीसाठी म्हणून ते पुन्हा या शहरात दाखल झाले आणि त्यांना रवींद्रनाथांच्याच घरात ‘जन गण मन’ गाण्याचे भाग्य लाभले. असा अनुभव आपल्या वाटय़ाला येईल याची कल्पनाही नसलेल्या अमिताभ यांनी राष्ट्रगीत गायल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना, राष्ट्रगीत गाताना तुमचे मन देशप्रेमाने आणि आदराने कसे ओथंबलेले असते याची अनुभूती तुम्ही कधी घेतली आहे.. मी आत्ताच घेतली. माझ्या डोळ्यात पाणी तरारले आहे, अशा शब्दांत आपली भावावस्था विशद केली.
तर इतका अविस्मरणीय प्रसंग आम्हाला चित्रित करता येईल, असे वाटले नव्हते. भारतीय चित्रपटाचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ यांच्या आवाजात राष्ट्रगीत गायले जावे तेही मूळ लेखकाच्या घरात.. काय अप्रतिम भावना आहे, या शब्दांत बाल्की यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे, मात्र ‘षमिताभ’ चित्रपटाच्या निमित्ताने ही किमया साधली गेली असली तरी या गाण्याचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले आहे.

Story img Loader