समाजमाध्यमांच्या लोकप्रियतेमुळे बॉलिवूडमधील कलाकार चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान आणि सोनाक्षी सिन्हासारखे आघाडीचे कलाकार फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टि्वटरसारख्या समाजमाध्यमांवर सतत सक्रिय असल्याचे आढळून येते. याचाच फायदा घेत काही अपप्रवृत्तीचे लोक कलाकारांच्या नावे खोटी खाती उघडून चाहत्यांची फसवणूक करत असल्याच्या घटनादेखील घडताना दिसतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाने @SrBachchanc टि्वटरवर बनावट खाते उघडण्यात आले असून, खुद्द बिग बींनी या बनावट खात्यापासून दूर राहण्याचा इशारा चाहत्यांना दिला आहे. हे बनावट खातेदार अमिताभ बच्चन यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरील संदेश रि-टि्वट करतात. या बनावट खात्याला १३,८०० फॉलोअर्स आहेत. @SrBachchanc हे बनावट खाते असून, यात जास्तीचा c जोडला गेला आहे… मी हे खाते उघडलेले नाही… कृपया या खात्यावर संवाद साधण्यापासून स्वत:ला दूर ठेवा, असा खबरदारीचा संदेश बिग बींनी आपल्या अधिकृत टि्वटर खात्यावरून @SrBachchan रविवारी प्रसिद्ध केला. अमिताभ बच्चन यांचे टि्वटरवर जवळजवळ दीड कोटी फॉलोअर्स आहेत. दिवसभारातील अपडेटस् टि्टरवर पोस्ट करून ते सतत त्यांच्याशी संपर्कात असतात.

Story img Loader