संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘गोलियो की रासलीलाः रामलीला’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. सचिनोत्सव चालू असतानाही तिकीट बारीवर या चित्रपटाने चांगली कमाई करत सोमवारपर्यंत ३३ कोटींच्यावर गल्ला गाठला आहे. या चित्रपटाने सर्वांचेच लक्ष्य वेधले होते. त्यातून मेगास्टार अमिताभ बच्चन हेदेखील स्वतःला चित्रपट पाहण्यापासून रोखू शकले नाही. इतकेच नाही तर या बॉलीवूड शहेनशहाने २४ तासांमध्ये ‘राम लीला’ चित्रपट तीन वेळा पाहिला.
चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ यांनी दिग्दर्शक संजय भन्साली, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांना फोन करून त्यांच्या कामाबद्दल अभिनंदन केले. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहले की, संजय भन्साली, दीपिका, रणवीर, सुप्रिया, रीचा, त्यांचे सहकारी, चित्रपटाचा भव्य सेट या सर्वांमुळे मला चित्रपट पाहताना सर्वात संस्मरणीय अनुभव आला. गेल्या २४ तासांमध्ये मी तीन वेळा रामलीला पाहिला असून परत मला हा चित्रपट पाहण्याची इच्छा आहे.
भन्सालीसोबत ‘ब्लॅक’ चित्रपटात काम करणा-या अमिताभ यांना बॉलीवूडमधील आताच्या पिढीकडे पाहून आनंद होतो. ही पिढी चित्रपटातील भूमिका प्रावीण्याने साकारण्यासाठी ज्याप्रकारे काम करते ते पाहणे माझ्यासाठी एकप्रकारचे गूढ असते. हे कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीचे उज्वल भविष्य आहेत आणि या सिनेसृष्टीचा मी एक छोटासा भाग असल्याचा मला गर्व आहे, असे अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहले.

Story img Loader