सचिन तेंडुलकरची निवृत्ती आणि भारतरत्न पुरस्काराच्या सन्मानार्थ १८ नोव्हेंबर रोजी वॉटरस्टोनस् क्लबमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी भावपूर्ण भाषण केले. सचिनने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे मोठ्या विनम्रतेने स्वागत केले.
अमिताभ त्यांच्या फेसबुक पेजवरील संदेशात म्हणतात, सचिनबरोबर एक सुखद संध्याकाळ घालवली, त्याला मिळालेल्या भारतरत्न पुरस्काराच्या सन्मानाचा आनंद संघातील सहकारी, कुटुंब आणि मित्रांबरोबर व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीसाठी त्याने आम्हाला आमंत्रित केले होते. आपल्या देशाच्या या महान खेळाडूला सर्वजण सदिच्छा देत होते. भारतीय संघाच्या सर्व खेळाडूंना भेटण्याचा योग आला… मैदानावरील यशस्वी कामगिरीसाठी ज्यांचे आपण कौतुक करतो आणि ज्यांच्याबद्दल मनात सन्मानाची भावना असते… ते अतिशय विनयशील आणि निस्वार्थी आहेत!! सचिनला भावी आयुष्यासाठी शुभकामना.
भारताची मान अभिमानाने उंचावल्याबद्दल सचिन तुझे आभार!!
यावेळी सचिनच्या सन्मानार्थ अमिताभ यांनी एक भावपूर्ण भाषणदेखील केले. अमिताभ म्हणाले, सचिनचे अभिनंदन, प्रथम भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारासाठी – देशाचा हा सर्वोच्च सन्मान तुला योग्य वेळी मिळाला आहे. देशातील कुठल्याही भागात किंवा क्रिकेट विश्वात सचिनचे नाव घेताक्षणी समोरच्या व्यक्तिच्या चेहऱ्यावर त्वरीत आनंदाची वा सन्मानाची भावमुद्रा बघायला मिळते. माझ्या मते सचिनचे अस्तित्व आयुष्यात खूप मोलाचे आहे. भारतीय संघ क्रिकेटचा सामना खेळत असतांना, त्या विषयीची माहिती जाणून घेतांना ‘सचिन खेल रहा है’… ‘बॅट करने आया’… ‘कितने रन बनाये’ अशाप्रकारचे प्रश्न पहिल्यांदा विचारले जातात. सामन्याची स्थिती जाणून घेणे हे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी गौण असते.
सचिनच्या निवृत्तीच्या वृत्ताने माझ्यासकट अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकवले. जणूकाही आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक महत्वाचा भाग कमी झाल्याची भावना निर्माण झाली. अनेक चाहत्यांमध्ये आणि खेळातील जाणकारांमध्ये नक्कीच अशाप्रकारची भावना निर्माण झाली असणार. कदाचित काहीजणांनी या महान प्रतिस्पर्धकाला यापुढे सामोरे जावे लागणार नाही म्हणून सुटकेचा निश्वास देखील सोडला असेल.
मला क्रिकेटविषयी तांत्रिक दृष्ट्या जास्त काही कळत नसल्याने मी त्याच्या खेळण्याच्या शैलीवर अथवा कौशल्यावर बोलू शकत नाही, परंतु जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मनात एकच विचार येतो – वयाच्या १६ व्या वर्षी मी कुठे होतो आणि काय करत होतो! आणि यापुढे जाऊन विचार करण्याची मला गरजच भासत नाही. ज्या वयात आपल्याला पॅन्टची बटन लावायला सुध्दा कष्ट पडतात, त्या वयात तो जगातील तीव्र गोलंदाजांच्या माऱ्याचा समाचार घेत त्यांच्यावर विजय प्राप्त करत होता!
त्याची किर्ती वाखाणण्यासाठी ‘महान’ आणि ‘आदर्श’ सारखी विभूषणे पुरेशी नाहीत. त्याच्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी शब्दकोशामध्ये नवीन शब्दांचा सहभाग करावा लागेल. काळाबरोबर इतिहासाचे किस्से बदलतील… परंतु काळ आणि इतिहास सचिनविषयीच्या आपल्या भावना कधीही बदलू शकणार नाही.
भारताची मान गर्वाने उंचावल्याबद्दल सचिन तुझे आभार!!