चित्रपट उद्योग, तिथली माणसे अगदी सेटवरच्या स्पॉटबॉयपासून सहकलाकारांपर्यंत ‘हे विश्वचि माझे’ घर अशी चित्रपट कलाकारांची अवस्था असते. प्रत्येक चित्रपट वेगळा, त्याचा सेट वेगळा, तिथे भेटलेली माणसे वेगळी आणि प्रत्येक वेळेचा अनुभव वेगळा. मग कधीतरी असा जुना अनुभव त्या नव्याला भिडतो तेव्हा आठवणींचा रिळ पुन्हा उलगडला जातो. अशीच काहीसी मनोवस्था ‘सत्याग्रह’ चित्रपटाच्या सेटवर बिग बी आणि करिना कपूरने अनुभवली.
चित्रिकरणाचा दिवस संपला की भरलेले मन ब्लॉगवर रिकामे करायचे, ही अमिताभ बच्चन यांची सवयच झाली आहे जणू. आणि म्हणूनच प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’च्या सेटवर अमिताभ बच्चन आणि करिना कपूर एकत्र आले तेव्हा दोघांशीही जोडला गेलेला एक धागा नव्याने जुळून आला. १९८३ सालच्या ‘पुकार’ चित्रपटात रणधीर कपूर आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत होते. त्या सेटवर लहानगी करिनाही बागडत असायची. चित्रिकरणादरम्यान रणधीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यात मारामारीचे दृश्य सुरू होते. आपल्या वडिलांना कोणीतरी मारते आहे, हे पाहून न राहवलेली करिना पळत पळत सेटवर आली आणि अमिताभकडे रागाने पाहू लागली. तेव्हा एवढय़ाशा चिमुरडीला आलेला राग पाहून अमिताभना कौतुक तर वाटलेच; पण, पळत पळत येऊन वडिलांना बिलगलेल्या करिनाचे चिखलाने माखलेले पाय पाहून बिग बीने तिचे पाय पाण्याने धुवून दिले. आता बिग बीच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या करिनाने अजूनही तो प्रसंग आपल्या मनात घर करून असल्याचे सांगितल्यावर हाही किस्सा पहिल्यांदा बिग बीच्या मनात आणि मग त्यांच्या ब्लॉगवर उतरला.

Story img Loader