राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवलेल्या ‘हलाल’ आणि ‘लेथ जोशी’ या चित्रपटांनंतर अमोल कागणे फिल्म्स नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी भरगच्च मेजवानी देणार आहेत. २०१९ मध्ये अमोल कागणे फिल्म्स सहा चित्रपट घेऊन येणार आहे. एकाच प्रॉडक्शन हाऊसचे एका वर्षांत सहा चित्रपट ही मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी घटना आहे.
एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी ‘परफ्युम’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचं दिग्दर्शन करण तांदळे यांनी केलं आहे. १ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. साईश्री क्रिएशन्सच्या श्रीधर चारी निर्मित लक्ष्मण कागणे अनघा भोगरे, अमृता देवधर, सहनिर्मित राजू पार्सेकर दिग्दर्शित ‘अहिल्या’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘वाजवुया बँड बाजा’ या चित्रपटाची निर्मिती अमोल कागणे फिल्म्सनंच केली आहे. अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथराव कागणे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. षष्ठीज फिल्म अँड एंटरटेन्मेंटचे अमित ललित तिळवणकर आणि अमोल कागणे फिल्म्सचे अमोल लक्ष्मण कागणे यांच्यातर्फे ‘तुझं माझं अॅरेंज मॅरेज’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिनेश विजय शिरोडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. ब्लॅक वॉल फिल्मची निर्मिती असलेल्या रोहित धिवार, शंतनू यादव निर्मित व रोहित धिवार दिग्दर्शित ‘निद्राय’ या चित्रपटाचाही समावेश आहे. सागर पाठक दिग्दर्शित एका क्रिकेटपट्टूच्या आयुष्यावर आधारित एक बायोपिक फिल्म अमोल कागणे फिल्म्स करणार असून चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यात सुरु होईल. तोपर्यंत चित्रपटाचे नाव आणि कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत.
एकाच वर्षांत सहा चित्रपट करण्याविषयी अमोल कागणे म्हणाले, ‘सहा चित्रपटांपैकी तीन चित्रपटाचे अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुतकर्ते, तर तीन चित्रपटांचे निर्माते आणि सहनिर्माते आहेत. वेगवेगळ्या विषयांचे, उत्तमोत्तम कलाकार असलेले, मनोरंजनासह विचार मांडणारे हे चित्रपट आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शकापासून पहिला चित्रपट करणाऱया शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शकाचाही चित्रपट आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं आशयसंपन्नतेची परंपरा पुढे घेऊन जाणारेच हे चित्रपट आहेत. वर्षभरात टप्प्याटप्प्याने हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील आणि प्रेक्षकांकडून त्याला नक्कीच दाद मिळेल, असा विश्वासही अमोल लक्ष्मण कागणे यांनी व्यक्त केला.