शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप! या काव्यात्मक ओळी कानावर पडल्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा आपल्या नजरेसमोर येतो. गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी ‘आग्र्याहून सुटका’हा महत्त्वपूर्ण कालखंड पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटातील गुलदस्त्यात असलेली अनेक नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
‘शिवप्रताप- गरुडझेप’ या चित्रपटात‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग यात दाखवला जाणार आहे. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी महाराजांनी कशी फत्ते केली हे या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आग्रा मोहिमेचा हा रोमांचकारी इतिहास येत्या ५ ऑक्टोबरला रुपेरी पडदयावर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटात मोगल बादशाह औरंगजेब या भूमिकेतील अभिनेत्याबद्दलचा उलगडा झाला होता. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते ही भूमिका कोण साकारणार याचे उत्तर समोर आले आहे.
आणखी वाचा : अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर नाव असलेली अभिनेत्री मनवा नाईक ही सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहे. मनवाने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती फार कमी दिसली. त्यानंतर आता बऱ्याच कालावधीनंतर ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. ‘शिवप्रताप गरुड़झेप’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सोयराबाई मोहिते या महत्त्वपूर्ण भूमिकेत ती झळकणार आहे.
या भूमिकेबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली, बऱ्याच कालावधीनंतर ते सुद्धा एका ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला आहे. या भूमिकेसाठी मी फारच उत्सुक आहे. अत्यंत रूपवान आणि लावण्यवती असणाऱ्या सोयराबाई यांची भूमिका करायला मिळणं हे माझ्यासाठी महत्तवपूर्ण होतं. माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तसेच मला स्वत:ला काही वेगळी भूमिका केल्याचं समाधान या भूमिकेने दिलं आहे.
आणखी वाचा : अमोल कोल्हेंचा बहुचर्चित ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, नवा टीझर चर्चेत
दरम्यान ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. येत्या ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मोगल बादशाह औरंगजेब आणि अभिनेत्री मनवा नाईक ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहे.