प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे ९७ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी २२ डिसेंबर रोजी मुंबईमधील कांदिवली येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते काही काळापासून वृद्धापकाळातील समस्यांनी ग्रस्त होते. इमरोज यांचे मूळ नाव इंद्रजित सिंग होते. कवयित्री अमृता प्रीतम यांच्यासोबतच्या नात्यामुळे इमरोज खूप लोकप्रिय झाले. ते दोघेही लग्न न करता ४० वर्षे एकमेकांसोबत राहिले होते.
अमृता प्रीतम आणि इमरोज यांच्या सून अलका क्वात्रा यांनी इमरोज यांच्या निधनाची पुष्टी केली. ‘इमरोज यांनी २२ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता मुंबईतील घरी अखेरचा श्वास घेतला. दुपारी कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले,’ असं अलका यांनी सांगितलं. अलका या अमृता प्रीतमचे पूत्र नवराज यांच्या पत्नी आहेत. नवराज अमृता व त्यांचे पूर्वाश्रमीचे पती प्रीतम सिंग यांचे पूत्र होते. नवराज यांचेही निधन झाले आहे.
मराठमोळ्या अभिनेत्याने गुजराती अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो आले समोर
इमरोज यांच्या जवळच्या व्यक्ती आणि कवयित्री अमिया कुंवर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. “कृत्रिम अन्ननलिकेद्वारे त्यांना अन्नपदार्थ देण्यात येत होते. पण एक दिवसही ते अमृताला विसरले नव्हते. कोणी तिच्याबद्दल भूतकाळात बोललं तर त्यांना आवडायचं नाही. ‘अमृता इथेच आहे’ असं ते म्हणायचे. इमरोज यांनी आता हे जग सोडलं असलं तरी आता ते निश्चितच अमृतासोबत स्वर्गात असतील. त्यांच्या निधनाने त्यांची प्रेमकथा मरेल अशी नाही,” असं अमिया कुंवर म्हणाल्या. मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमृता प्रीतम यांची नात शिल्पी हिच्या हस्ते इमरोज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
२६ जानेवारी १९२६ रोजी अविभाजित पंजाबच्या लायलपूरमधील चक नंबर ३६ इथे इमरोज यांचा जन्म झाला होता. १९६६ मध्ये, जेव्हा अमृतांनी त्यांचे ‘नागमणी’ मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांनी कलाकार व चित्रकार म्हणून काम केले. नंतर त्यांनी आपले नाव इंद्रजीत बदलून इमरोज ठेवले होते. अमृता व इमरोज लग्न न करता ४० वर्षे एकत्र राहिले होते. अमृता त्यांना जीत म्हणून हाक मारायच्या. इमरोज यांनी ‘अमृता के लिए नज्म जारी है’ नावाचे पुस्तकही अमृता यांच्यासाठी लिहिले होते, ते २००८ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते.