बॉलिवूड कलाकारांना या क्षेत्रात जेवढी प्रसिद्धी मिळते तेवढीच टीका देखील सहन करावी लागते. अनेकदा कलाकार याकडे दुर्लक्ष करतात मात्र काही वेळा ते त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तरही देतात. आता अभिनेत्री अमृता अरोरासोबतही असंच काहीसं घडलं आहे. सोशल मीडिया पोस्टवरून ट्रोल झाल्यानंतर अमृतानं ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अमृता अरोरा, मलाइका अरोरा, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, करीना कपूर आणि ऐश्वर्या राय या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती आणि त्यानंतर या अभिनेत्रींना त्यांचं वाढलेलं वजन आणि वय यावरून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. अभिनेत्री अमृता अरोरानं देखील या पार्टीतील करीना कपूर आणि मलायका अरोरासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यावर एका युजरनं ‘म्हातारी’ अशी कमेंट केली होती. ज्यावर अमृतानं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
युजरनं केलेल्या कमेंटचा स्क्रिनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना अमृतानं लिहिलं, ‘अशा कमेंट मी नेहमीच पाहते पण याने मला फारसा फरक पडत नाही. मी याकडे लक्षही देत नाही. पण वाढलेलं वय खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे का? कारण माझ्यासाठी हा फक्त एक शब्द आहे. वाढत्या वयासोबत आम्ही जास्त बुद्धिमान आहोत. पण तुम्ही कोण आहे. नाव नसलेले, चेहरा नसलेले आणि कमी वय असणारे?’
आपल्या आणखी एका पोस्टमध्ये अमृताने लिहिलं, ‘अनेकांनी माझं वजन वाढल्यामुळेच माझा तिरस्कार केला आहे. पण मला माझं वाढलेलं वजन आवडतं. माझं वजन ही माझी समस्या आहे. त्यामुळे इतरांनी याकडे लक्ष न दिलेलंच चांगलं.’ अमृताच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. यात करीना कपूर, मलायका अरोरा, गॅब्रिएला यांचा समावेश आहे.