विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर सोशल नेटवर्किंगवरील वक्त्यांमुळे अमृता या चर्चेत असल्याचे चित्र पहायला मिळतं. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमृता यांनी गाण्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल अगदी मनमोकळेपणा गप्पा मारताना, जे ट्रोलिंग होत आहे ते राजकीय दृष्ट्या केलं जात आहे की सामान्यांकडून केलं जात आहे हे मला ठाऊक आहे असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी येत्या गुरुवारी (१७ डिसेंबर २०२०) माझं अजून एक गाणं येत असून ट्रोलर्सचं स्वागत आहे असा टोलाही ट्रोलिंग करणाऱ्यांना लगावला आहे.
सोशल नेटवर्किंगवर प्रचंड अॅक्टीव्ह असणाऱ्या अमृता यांना ट्रोलिंगसंदर्भात ‘मुंबई तक’ने घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अमृता यांनी, “ट्विटर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करतो तेव्हा त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्याचा हक्क असतो. तसा हक्क मी ही बजावते. अनेकदा मी माझी मत सोशल नेटवर्किंगवरुन मांडत असते. कधी मी ट्रोल होते तर कधी माझं कौतुक होतं. हे पार्ट अॅण्ड पार्सल ऑफ लाइफ आहे,” असं मत व्यक्त केलं.
नक्की वाचा >> “फक्त गाण्याचा एक कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच!”
ट्रोलिंग आणि टीका वाचून निराश व्हायला होतं का?, असा पुढचा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना अमृता यांनी, “मी कानसेन पण आहे आणि थोडी तानसेन पण आहे. मी चांगल्या लेव्हलपर्यंत गाणं शिकलेलं आहे लहानपणापासून. त्यामुळे मला माझे प्लस पॉइण्ट काय आहेत आणि मायनस पॉइण्ट काय आहेत हे ठाऊक आहे. जे ट्रोलिंग होत आहे ते राजकीय दृष्ट्या केलं जात आहे की सामान्यांकडून केलं जात आहे हे मला ठाऊक आहे,” असं उत्तर दिलं.
“जेव्हा स्वत:वर एक विश्वास असतो तेव्हा आपल्याला ठाऊक असतं की आपण किती लायक आहोत. माझं अत्ताचं गाणं होतं ते सामाजिक गाणं होतं. स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात होतं. त्यावर काय प्रकारचं ट्रोलिंग झालं ते पाहिलं आपण. मला वाटतं की हे खरे लोकांचे, सामान्य लोकांचे विचार नाहीयत. मला वाटतं की मला तेवढी बुद्धी आहे. माझ्या आसपासच्यांना तेवढी बुद्धी आहे की ते मला डायरेक्ट करु शकतात तू बरोबर करते आहे की नाही. त्यांनीही मला म्हटलं की यात काहीही गैर नव्हतं आणि मी आतापर्यंत जे केलं त्यातही काहीही चुकीचं नव्हतं,” असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
नक्की वाचा >> अमृता फडणवीसांच्या गाण्यावर Dislikes चा पाऊस
गाणी गाण्यासंदर्भातील निर्णय घेताना आपण काही सामाजिक तर कधी कोणाला तरी पाठिंबा दर्शवण्यासाठी मोफत गाणी गातो, असंही अमृता म्हणाल्या. “काही सामाजिक गाणी असतात तर कधी कधी काही निर्माते म्हणतात की आमच्यासाठी करु द्या. आम्ही त्याला मार्केटींग करतो वगैरे तेव्हा मी करते काही गाणी. त्यात मला काही गैर वाटत नाही. मी कोणाकडूनही पैसा घेत नाही. मी स्वत:च्या इच्छेसाठी गाणी गाते. माझ्यात टॅलेंड आहे म्हणून गाते. गाणं हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे ते माझं जीवन नाहीय. त्यामुळे तुम्ही जितकं ट्रोलिंग करायचं आहे तितकं करा,” असं अमृता यांनी म्हटलं आहे.
ट्रोलिंग करणाऱ्यांना अमृता यांनी नवीन गाणं येत असल्याची माहिती दिली. “येत्या गुरुवारी माझं अजून एक गाणं येत आहे त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांच स्वागत आहे. हे गाणं एका गूढपटामधील असल्याची माहितीही अमृता फडणवीस यांनी दिली. हे एक प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणं एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा,” असं आवाहनही अमृता यांनी केलं.