आपण कायम सुंदर दिसावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. सुंदर त्वचा आणि फिटनेससाठी अनेक व्यक्ती विविध टिप्स आणि हेल्थ केअर रूटीन फॉलो करतात. त्यामध्ये अनेक तरुणी आपले आवडते कलाकार कोणत्या टिप्स फॉलो करतात याच्या शोधात असतात. अशात मराठी सिनेसृष्टीची चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच तिच्या स्किन केअर रूटीनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अमृता खानविलकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील विविध माहिती शेअर करत असते. त्यामध्ये कामाचे अपडेट्स असतात. तसेच तिच्या खासगी आयुष्यात काय घडत आहे याची माहितीसुद्धा ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अमृता तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. त्यासह ती तिचं स्किन केअर रूटीनसुद्धा योग्य पद्धतीनं फॉलो करते.
अमृतानं इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा वर्कआउटनंतरचा स्किन केअर रूटीनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “नमस्कार, वर्कआउटनंतरच्या माझ्या स्किन केअर रूटीनच्या या व्हिडीओमध्ये तुमचं स्वागत. सर्वांत आधी मी एक्सफ़ोलिएटिंग जेल चेहऱ्यावर लावते. हे जेल अत्यंत सॉफ्ट आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेला कोणताही त्रास होत नाही. त्यानंतर मी रेमी लॉर क्लिन्सिंग टोनर चेहऱ्यावर लावते. अनेक वर्षांपासून मी हे अतिशय सुंदर टोनर वापरत आहे.”
आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये टोनर फार महत्त्वाचं असतं, असंही तिनं व्हिडीओमध्ये पुढे सांगितलं आहे. “त्यानंतर थंड पाण्यानं मी चेहरा धुऊन घेते”, असं सांगताना कृपया गरम पाण्याने चेहरा धुऊ नका. कारण- ते त्वचेसाठी अजिबात चांगलं नसतं, असंही अमृतानं म्हटलं आहे. स्किन केअर रूटीनमध्ये तिनं शेवटी ओठांवर एक लिप बाम लावला आहे.
अमृतानं वर्कआउटनंतर स्किन केअर रुटीनचा हा व्हिडीओ पोस्ट करीत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ” वर्कआउटनंतर स्किनकेअर रूटीन आवश्यक आहे. कारण- वर्कआउटमुळे आनंदी हार्मोन्स रिलीज होत असले तरीही ते तुमच्या त्वचेवरील छिद्रेदेखील बंद करतात. म्हणून वर्कआउटनंतर माझं स्किनकेअर रूटीन काय आहे ते मी शेअर करत आहे.”
अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, नुकतीच ती ‘संगीत मानापमान’ चित्रपटातील ‘वंदन हो’ या गाण्यात दिसली. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘गोलमाल’ या चित्रपटातून तिनं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘साडे माडे तीन’, ‘कॉन्ट्रॅक्ट’, ‘फूंक’ या काही चित्रपटांत काम केल्यावर ती ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ या गाण्यात दिसली. या गाण्यामुळे अमृतानं मोठा चाहता वर्ग कमवला. ‘वाजले की बारा’नंतर ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील अमृताचं ‘चंद्रा’ हे गाणंही तुफान गाजलं.