चमचमत्या चंदेरी दुनियेचं सर्वांनाच आकर्षण असतं. या चंदेरी दुनियेमध्ये काम करणार्‍या कलाकारांचं यश, प्रसिद्धी आणि लोकप्रियता सगळ्यांनाच दिसते. पण त्यासाठी कलाकार घेत असलेली मेहनत ही नेहमीच पडद्याआड दडलेली असते. संघर्ष प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य टप्पा, अशी पायरी जी चढल्याशिवाय यशाचा किल्ला सर करणे अशक्यच आहे. अशीच मेहनत आणि संघर्ष करत एका मराठी अभिनेत्रीने आपलं नांव कमावलं आहे, ही अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar).

आपल्या अभिनयाने अमृताने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच अमृता नृत्यातही पारंगत आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची व नृत्यविष्काराची झलक सर्वांना दाखवली आहे. आज या क्षेत्रात तिची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असली तरी यामागे तिचा संघर्ष आहे. याबद्दल तिने नुकतंच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. ज्यात तिने तिचा या इंडस्ट्रीत आल्यानंतरचा संघर्ष सांगितला आहे.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिच्या संघर्षाविषयी असं म्हटलं की, “मी काम करायला सुरुवात केली तेव्हा आमच्या घरात फारसे पैसे नव्हते. पैसे नसल्यामुळे काही अडचणी यायच्या. मी फक्त एवढंच बघितलं आहे की, आज आमच्याकडे दुधाला पैसे नाहीत. आज आमच्याकडे कपडे घ्यायला पैसे नाहीत, दिवाळीत खरेदीसाठी पैसे नाहीत. त्यामुळे मला असं झालेलं की, आता काम करून पैसे कमवायचे आहेत. म्हणून मग सुरुवातीला मी जे मिळेल ते काम केलं आहे.”

पुढे अमृताने असं म्हटलं आहे की, “मी सूत्रसंचालन केलं आहे. मी डान्स केले आहेत. मी गाणी केली आहेत. मी हिंदीमध्ये काम केलं आहे. मी टेलीव्हिजनमध्ये काम केलं आहे. म्हणाल त्या त्या ठिकाणी मी काम केलं आहे. म्हणजे मला आठवतंय की, एका मोठ्या चॅनेलवर मी कुठलातरी सूत्रसंचालनाचा शो करत होते. तर तेव्हा मी तीस-तीस टेक घेत असे आणि लोक मला तिकडे काय ही कशी आहे? हिला शब्द उच्चारता येत नाही. उभं राहायची पद्धत नाही. कळत नाही काही नाही असं म्हणायचे.”

अभिनेत्री अमृता खानविलकर (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

पुढे अमृताने म्हटलं की, “तेव्हा कुणीतरी कपडे दिले, कुणी मेकअप केला. कुणी लाल लिपस्टिक दिली. तेव्हा कुठे काय अक्कल होती. कशावर काय चांगलं दिसतं. मग माझं असं व्हायचं ओके. सगळं काही ओकेच असायचं. मला तेव्हा काहीही माहित नव्हतं. त्या गोष्टींमधून निघून मी २००६ मध्ये माझा पहिला मराठी चित्रपट केला आणि मग मागे वळून बघितलं नाही. खूप संघर्ष असं नाही म्हणता येणार, पण या क्षेत्राने खूप काही शिकवलं आहे”.

दरम्यान, अमृता खानविलकर तिच्या आगामी ‘सुशीला-सुजीत’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अमृता पहिल्यांदा आइटम साँग करणार असून तिच्या नृत्याची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटात स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, सुनिल तावडे, रेणुका दफ्तरतार असे दिग्गज कलाकार आहेत. प्रसाद ओकने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.