मराठी अभिनेता प्रसाद ओक हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील गाणी, त्यातील संवाद हे कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका रुपेरी पडद्यावर हुबेहुब साकारली होती. या भूमिकेनंतर त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आनंद दिघे यांची आज २१वी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीनिमित्त प्रसाद ओकने खास पोस्ट केली आहे. यात त्याने आनंद दिघेंच्या जीवनावर एक पुस्तक लिहिल्याचे सांगितले आहे.
प्रसाद ओक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. या पुस्तकावर ‘माझा आनंद’ असे लिहिण्यात आले आहे. त्याखाली प्रसाद ओक असे लिहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. यासोबत त्याने आनंद दिघे यांचा एक जुना फोटोही शेअर केला आहे. याला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “दिघे साहेबांची गोष्ट खोटी…” प्रसाद ओकचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
“मा. दिघे साहेबांना, विनम्र अभिवादन…!!! लवकरच धर्मवीरच्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं “माझा आनंद” हे पुस्तक प्रकाशित होतंय. चित्रपटाइतकंच प्रेम पुस्तकावर सुद्धा कराल हीच आशा..!! जय महाराष्ट्र…!!!”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्याखाली त्याने प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, अक्षर सुलेखन : सचिन गुरव आणि शब्दांकन : प्रज्ञा पोवळे असेही लिहिले आहे. या फोटोला हॅशटॅग देताना त्याने माझा आनंद, मराठी, मराठी पुस्तक असे टॅग दिले आहेत. दरम्यान या निमित्ताने प्रसाद ओकने लेखन क्षेत्रात पदार्पण केल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याच्या या पुस्तकात नेमकं काय असणार? ते कधी प्रकाशित होणार? याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र त्याच्या या घोषणेनंतर त्याचे अनेक चाहते यावर व्यक्त होताना दिसत आहे. काहींनी यावर वाह!! वाचायला आवडेल अशी कमेंट केली आहे.