ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाने एक नवा विक्रम रचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी धर्मवीर चित्रपटाचे ३० फुटी कट आऊट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे या चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यानंतर आता या चित्रपटाने एक नवा विक्रम रचला आहे. मुंबईतील वांद्रे येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे म्हणजेच १६ हजार ८०० स्क्वेअर फुटाचे भव्य होर्डिंग आहे. आतापर्यंत या होर्डिंगवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. पण धर्मवीर चित्रपटाने हा विक्रम रचला आहे.
आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाचे भव्य दिव्य पोस्टर झळकले आहे. याचा एक व्हिडीओही त्या चित्रपटाच्या टीमने शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे यावर अनेकांच्या कमेंट्स आणि लाईक्सही पाहायला मिळत आहेत.
नुकतंच या चित्रपटाच्या टीमने इन्स्टाग्रामवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. “धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे’ चित्रपटाने रचलाय नवा विक्रम, उभारलं आहे 120×120 फुटाचं मराठी सिनेविश्वातील सर्वात मोठं पोस्टर. येत आहे एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा ‘धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे’ मोठ्या पडद्यावर #13मे2022 पासून”, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.
“माझ्यात आणि दिघे साहेबांमध्ये…”, अभिनेता सलमान खानची ‘धर्मवीर’ चित्रपटाबद्दल पहिली प्रतिक्रिया
दरम्यान ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.