राजकारण, तेथे होणारा भ्रष्टाचार, पसा आणि सत्ता यांचा खेळला जाणारा खेळ आणि त्यात सामान्य माणसाची होणारी फरफट याबद्दलच्या चर्चा प्रत्येक चौकाचौकात रंगतात. आता याच विषयावर विनोदी पद्धतीने भाष्य करणारी ‘हम्मा लाइव्ह’ ही मालिका ‘ई टीव्ही’वर लवकरच पाहायला मिळणार आहे.
एका वृत्तवाहिनीत घडणाऱ्या घटनांचे चित्रण या मालिकेमध्ये करण्यात आले असून अभिनेता आनंद इंगळे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत विद्याधर जोशी, नम्रता आवटे आणि अंशुमन विचारे यांच्याही भूमिका आहेत. या मालिकेसंबंधी सांगताना ‘ई टीव्ही’च्या फिक्शन हेड अपर्णा पाडगावकर म्हणाल्या, ‘आपल्या रोजच्या आयुष्यात भ्रष्टाचार, काळा पसा या विषयांना कुठे ना कुठे सामोरे जावे लागतेच. याच विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न आम्ही या मालिकेत केला आहे. या समस्यांवर ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून टीका करत आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी ही मालिका असेल.’
मात्र, मालिकेत वृत्तवाहिनीची पाश्र्वभूमी घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, ‘यामागे वृत्तवाहिन्यांच्या कारभारावर टीका करण्याचा आमचा उद्देश नाही. तर वृत्तसंस्थांमध्ये काम करणाऱ्यांसमोर प्रत्येक बातमीचे खरेखोटे विविध पलू येत असतात. त्यातील लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे प्रत्यक्षात वाहिनीवर किंवा वृत्तपत्रामध्ये मांडले जातात. त्यामुळे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक विषयाचे विविध पलू लोकांसमोर मांडण्यास मदत होऊ शकेल, असे वाटल्यानेच ती पाश्र्वभूमी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.
आठवडय़ातून दोनदा दाखवल्या जाणाऱ्या या मालिकेमध्ये दर आठवडय़ाला एका नवीन विषयाला हात घातला जाणार आहे. पण, मालिकेतून कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी ‘गुरुमंत्र’ देण्याचा प्रयत्न न करता त्यावर बोलून, चर्चा करून त्याच्याविरुद्ध लढण्याविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा मालिकेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
‘सामान्य माणूस आपल्या क्षमतेनुसार प्रश्नांमधून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अमुक एका मार्गानेच तुम्हाला तुमच्यासामोरील समस्या सोडवता येईल, असे सांगणे निर्थक ठरेल. आम्हाला केवळ त्याच्या मनात समस्येविरुद्ध लढण्याचा आत्मविश्वास निर्माण करायचा आहे, असे पाडगावकर यांनी सांगितले.

Story img Loader