प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं म्हणतात. पण काही यशस्वी स्त्रियांमागे खंबीरपणे उभं राहून त्यांची साथ देणारे पुरुषही असतात. याचीच प्रचिती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाच्या टीझरमधून येते. कित्येक भारतीय स्त्रियांनी विलक्षण असे कार्य करून देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे. त्याच स्त्रियांपैकी एक म्हणजे – आनंदीबाई गोपाळ जोशी! त्यांच्याच आयुष्यावर आधारित हा बायोपिक आहे.
या बायोपिकमध्ये अभिनेता ललित प्रभाकर गोपाळ जोशी यांच्या भूमिकेत आहे. वयाच्या दहाव्या वर्षी आनंदीबाईचं लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झालं. मी आनंदीबाईंना माझ्या मनाप्रमाणे शिकवेन अशी अट गोपाळरावांनी आनंदीबाईच्या वडिलांना घातली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाईंना गोपाळरावांनी शिकवलं. आनंदीबाईंचा खरा आधार ते ठरले. हेच या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. हा टीझर संपूर्णपणे गोपाळ जोशी यांच्यावर आधारित आहे. आनंदीबाईंची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. या चित्रपटात आनंदीबाईंची भूमिका साकारणार कोण याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून आहे.
आनंदीबाई म्हणजे महाराष्ट्रानं देशातल्या प्रत्येक महिलेला दिलेली देगणी आहे असं म्हणत झी स्टुडिओनं या चित्रपटाची घोषणा केली. १५ फेब्रुवारीला आनंदीबाईचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.