अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. येत्या १२ जुलैला अंबानी कुटुंबीय त्यांच्या घरच्या नव्या सुनेचं स्वागत करणार आहेत. दरम्यान, या जोडप्याच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना आता सुरुवात झालेली आहे. २ जुलैला मुकेश अंबानींनी लेकाच्या लग्नाआधी ५० गरीब जोडप्यांची लग्न लावून दिली. या सोहळ्याला संपूर्ण अंबानी कुटुंबीय उपस्थित होते. अशातच आता अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी पार पडणाऱ्या समारंभातील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबानींच्या घरी ‘मामेरु’ समारंभासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या संपूर्ण घराजवळचा परिसर यासाठी सजवण्यात आला आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राधिका मर्चंटने या समारंभासाठी भरजरी गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. या लूकमध्ये होणारी नवी नवरी अतिशय सुंदर दिसत आहे. या ‘मामेरु’ समारंभाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘विरल भय्यानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरुन हे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. ‘मामेरु’ हा समारंभ नेमका असतो तरी काय जाणून घेऊयात…

हेही वाचा : “आमचं शेतीघर…”, नम्रता संभेरावने निसर्गाच्या सानिध्यात बांधलं टुमदार घर, लेक रुद्राज व पतीसह केला गृहप्रवेश

गुजराती लग्नात होणारा ‘मामेरु’ समारंभ म्हणजे काय?

गुजराती लोकांमध्ये लग्नाआधी या ‘मामेरु’ समारंभाचं आयोजन केलं आहे. यासाठी वर आणि वधूचे मामा आपआपल्या भाच्यांसाठी, बहि‍णींसाठी तसेच भावोजींसाठी नवीन दागिने, कपडे, साड्या, बांगड्या व इतर भेटवस्तू घेऊन येतात. वर आणि वधू दोघांच्याही घरी हा समारंभ साजरा केला जातो. यानुसार राधिका मर्चंटला तिचे मामा, तर अनंतला नीता अंबानी यांचे भाऊ भेटवस्तू देतील. लग्नघरात येताना मामा वाजतगाजत, मिरवणूक काढून या भेटवस्तू घेऊन येतात. या ‘मामेरु’ समारंभासाठीच आज अंबानींचं संपूर्ण घर सजलं आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं, तर शुक्रवार १२ जुलै रोजी अनंत-राधिका सात फेरे घेणार आहेत. यानंतर शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. याशिवाय रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना काय-काय दिलं? जाणून घ्या…

दरम्यान, अनंत-राधिकाच्या लग्नाचे सगळे विधी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने होणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूडपासून ते परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani and radhika merchant mameru ceremony video viral sva 00