Anant Ambani And Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा शुक्रवारी ( १२ जुलै ) रात्री मुंबईतल्या बीकेसी परिसरातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूड कलाकार, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांसह अनेक परदेशी पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. सायंकाळी बरोबर पाच वाजता या समारंभाला सुरुवात झाली. सोहळ्याला सुरुवात होताच बॉलीवूड सेलिब्रिटींनी नटून थटून लग्नाच्या थीमनुसार लग्नमंडपात एन्ट्री घेत पापाराझींसमोर पोज दिल्या. अशातच आता या सोहळ्यातील अनेक Inside व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनंत – राधिकाचा मुख्य लग्नसोहळा सुरु होण्यापूर्वी ग्रँड लग्न वरातीचा कार्यक्रम पार पडला. लग्नाच्या वरातीत प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह, अनिल कपूर, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, अनन्या पांडे, वीर पहारिया, मानुषी, खुशी कपूर, वरुण धवन, सलमान खान, शाहरुख खान, रितेश-जिनिलीया, माधुरी दीक्षित असे सगळे सेलिब्रिटी जबरदस्त डान्स करत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : नवरी नटली गं! नववधू राधिका मर्चंटचा पहिला फोटो आला समोर, गुजराती ‘पाणेतर’ लेहेंगा घालून सजली अंबानींची सून
अंबानींची धाकटी सून राधिका मर्चंटने वरात चालू असताना सासरेबुवा मुकेश अंबानींचा हात धरून लग्नमंडपात एन्ट्री घेतली. मुकेश व नीता अंबानी राधिकाला स्वत:च्या मुलीप्रमाणे सांभाळतात. त्यामुळे लग्नमंडपात सुनेच्या स्वागतासाठी दोघांनाही पुढाकार घेतला होता. वरात संपल्यावर मुख्य लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
लग्नात राधिकाच्या ग्रँड एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होता. रथात बसून अंबानींच्या धाकट्या सुनेने या सोहळ्यात अगदी स्वप्नवत एन्ट्री घेतली. यावेळी सगळेजण भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. सात फेरे, वरमाला असे सगळे विधी पार पडल्यावर अनंत व राधिका साता जन्माचे सोबती होऊन लग्नबंधनात अडकले.
दरम्यान, अनंत-राधिकाचा साखरपुडा २०२३ मध्ये झाला होता. यानंतर यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे या दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा तर, दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीत क्रुझवर पार पडला होता. अंबानींच्या राहत्या घरी म्हणजेच अँटालियावर अनंत – राधिकाच्या लग्नाआधीचे सर्व विधी पार पडले होते. आता दोघंही लग्नबंधनात अडकले आहेत. रविवारी सायंकाळी अंबानी कुटुंबीयांनी अनंत-राधिकाच्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे.