Ambani Wedding Mumbai Police Issues Traffic Advisory : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी परदेशातून मुंबईत दाखल झाले आहेत. याशिवाय एकूण तीन दिवस पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाचे सगळे विधी मुंबईतील बीकेसी येथील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने पार पडणार आहे. १२ जुलै ते १५ जुलै या दरम्यान हे सगळे कार्यक्रम संपन्न होतील. या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील बीकेसी परिसरातील वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.

अनंत – राधिकाच्या लग्नामुळे वाहतूक कोंडी

अनंत-राधिकाचा शाही विवाहसोहळा आज ( १२ जुलै २०२४ ) बीकेसी येथे पार पडणार आहे. यामुळेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर सध्या वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या लग्नसोहळ्यामुळे बीकेसीकडे जाणारे अनेक मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शिवाय या परिसरातील बहुतांश कंपन्यांनी आज कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात एक्स पोस्ट शेअर करत कोणते मार्ग बंद असतील आणि नागरिक प्रवासासाठी कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर करू शकतात यासंदर्भात माहिती दिली आहे.

१२ जुलैपासून ते १५ जुलै रात्री १२ पर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक मार्गात बदल करण्यात येईल असं वाहतूक पोलिसांनी एक्स पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं आहे. या लग्नाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीमधील अनेक मार्ग वाहनांच्या रहदारीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा : Ambani Wedding : अंबानींच्या घरी पार पडली गृहशांती पूजा; अनंत-राधिकाला पाहताच मुकेश अंबानी झाले भावुक! Inside व्हिडीओ व्हायरल

१. प्रदेश बंद मार्ग :- लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून, धिरूभाई अंबानी स्क्वेअर अ‍ॅव्हेन्यू लेन-३ मार्गे इंडियन ऑइल पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन तसेच एमटीएनएल कार्यालयाकडून कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता (कार्यक्रमाकरीता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग :- वन बीकेसीकडून येणारी वाहतूक व रहदारीची वाहनं लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून डावे वळण घेऊन पुढे डायमंड जंक्शन येथून उजवे वळण घेत धिरुभाई अंबानी स्क्वेअर येथून बीकेसी परिसरात मार्गस्थ होतील.

२. प्रवेश बंद मार्ग : कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन व परिसरातील सर्व वाहनांना बीकेसी कनेक्टर ब्रिजच्या दिशेने जाण्याकरीता धिरुभाई अंबानी स्क्वेअर येथून (कार्यक्रमाकरीता येणारी वाहने वगळून) प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग – कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन, नाबार्ड जंक्शनकडून डावे वळण व डायमंड गेट नं.८. समोरून लक्ष्मीटॉवर जंक्शन येथून उजवे वळण घेत बीकेसी परिसरात मार्गस्थ होतील.

३. प्रवेश बंद मार्ग – भारत नगर, वन बीकेसी (कार्यकमाकरीता देणारी वाहने वगळून) येथील सर्व वाहनांना जिओ कन्वेंशन सेंटर गेट क्र. २३ येथून जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, एमटीएनएल जंक्शनच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग – कौटील्य भवन येथून उजवे वळण घेतल्यावर पुढे अ‍ॅव्हेण्यु १ रोडने वाहनं धिरुभाई अंबानी स्कूल येथून इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

हेही वाचा : Video: अनंत-राधिकाच्या लग्नाला पाहुण्यांची सुरू झाली लगबग; प्रियांका चोप्रा, राम चरण आपल्या कुटुंबासह मुंबईत झाले दाखल

४. प्रदेश बंद मार्ग – एमटीएनएल जंक्शन येथून (कार्यक्रमाकरीता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना सिग्नेचर/समटेक बिल्डींग येथून जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर, बीकेसी कनेक्टर ब्रिजच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग :- धिरुभाई अंबानी स्कूलकडून डावे वळण घेऊन अ‍ॅव्हेण्यु १ रोडने पुढे गोदरेज बीकेसीच्या दिशेने जाऊन वाहनं इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

एकदिशा मार्ग

१) लतीका रोड हा अंबानी स्क्वेअर ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंत जाणारा मार्ग वाहतुकीसाठी एक दिशा ( वनवे ) करण्यात येत आहे.

२) अ‍ॅव्हेन्यु ३ रोड हा कौटील्य भवन ते अमेरिकन दूतावास जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी एक दिशा करण्यात येत आहे.

त्यामुळे लग्नासोहळ्याचे हे तीन दिवस वाहतूक मार्गात झालेले पाहून बदल पाहून मुंबईकरांनी प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे.