अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा चालू आहे. भव्य प्री-वेडिंगनंतर हे जोडपं जुलै महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर अनंत-राधिकाच्या लग्नाची तारीख आणि लग्नपत्रिकेचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतचं लग्न जुलै महिन्यात पार पडणार आहे. अनंत-राधिकाचा साखरपुडा जानेवारी २०२३ मध्ये झाला होता. यानंतर साधारण वर्षभराने म्हणजेच मार्च २०२४ मध्ये या जोडप्यासाठी गुजरातमधील जामनगर येथे भव्य प्री-वेडिंग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्री-वेडिंगला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. सलमान खान, शाहरुख खान पासून ते हॉलीवूड कलाकारांपर्यंत अनेकजण या लग्नसोहळ्यासाठी जामनगरला आले होते.
अनंत-राधिकाच्या लग्नात तीन दिवस होणार कार्यक्रम
सध्या अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी इटलीमध्ये क्रुझ बूक करण्यात आली आहे. यासाठी बॉलीवूडचे बरेच सेलिब्रिटी इटलीला रवाना झाले आहेत. दुसरं प्री-वेडिंग सुरू असतानाच या दोघांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शुक्रवार १२ जुलै रोजी अनंत-राधिका सात फेरे घेणार आहेत. यानंतर शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. यानंतर रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा : Video : औक्षण, मोदकाचा बेत अन्…; लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेली तितीक्षा तावडे, जावयाचं ‘असं’ केलं स्वागत
अनंत-राधिकाच्या लग्नाचे सगळे विधी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने होणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूडपासून ते परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान-सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट कोहली-अनुष्का शर्मा, विकी कौशल, कतरिना कैफसह अनेक स्टार्सची नावे आहेत. याशिवाय बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प यांच्यासह अनेक परदेशी पाहुणे देखील भारतात उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीमध्ये भव्या क्रूझवर पार पडत आहे. हे सेलिब्रेशन ३ दिवस होणार आहे. ही क्रूझ इटली ते फ्रान्स असा प्रवास करणार आहे. या सोहळ्यासाठी एकामागून एक सगळेच बॉलीवूड सेलिब्रिटी इटलीला रवाना झाले आहेत.