देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीची गेल्या १० दिवसांपासून पदयात्रा सुरू होती. जामनगर ते द्वारकाधीश अशी ही १७० किलोमीटरची पदयात्रा आज अनंत अंबानीने पूर्ण केली. २९ मार्चला ही पदयात्रा सुरू झाली होती. आज सकाळी द्वारकाधीशमध्ये अनंत अंबानीच्या पदयात्रेचा समारोप झाला. पदयात्रेत शेवटच्या दिवशी अनंतची आई नीता अंबानी व पत्नी राधिका मर्चंट सहभागी झाल्या होत्या. यावेळी दोघींनी अनंतचं भरभरून कौतुक करत त्याचा खूप अभिमान असल्याचं सांगितलं.

माध्यमांशी संवाद साधताना अनंत अंबानी म्हणाला, “ही माझी स्वतःची आध्यात्मिक यात्रा आहे. मी देवाचं नामस्मरण करत या यात्रेला सुरुवात केली होती आणि देवाचं नामस्मरण करत या यात्रेचा शेवट केला. मी भगवान द्वारकाधीशांचे आभार मानू इच्छितो. माझ्या पदयात्रेत सामील झालेल्या सर्व लोकांचाही मी आभारी आहे.”

यावेळी नीता अंबानी यांनी धाकटा मुलगा अनंतने जामनगर ते द्वारका हा १७० किमीचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल अभिमान आणि आनंद व्यक्त केला. नीता अंबानी म्हणाल्या की, एक आई म्हणून अनंतला ही पदयात्रा पूर्ण करताना पाहणं खूप अभिमानाची गोष्ट आहे. गेल्या १० दिवसांपासून, अनंतच्या पदयात्रेत सहभागी होणारे सर्व तरुण आपल्या संस्कृतीचा प्रचार, प्रसार करत आहेत. मी फक्त द्वारकाधीशांना प्रार्थना करते की, त्यांनी अनंतला शक्ती द्यावी.

पुढे अनंतची पत्नी राधिका मर्चेंट म्हणाली, “लग्नानंतर अनंतला ही पदयात्रा करण्याची खूप इच्छा होती. आज अनंतचा ३० वा वाढदिवस आहे. आमच्या लग्नानंतर ही पदयात्रा करण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. आज आपण त्याचा वाढदिवस येथेच साजरा करत आहोत. मला अनंतचा खूप अभिमान आहे. त्याची पदयात्रा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी त्याला आशीर्वाद दिले त्या सर्वांचे मी आभार मानते.”

दरम्यान, अनंत अंबानी जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीची देखरेख करतो. देशातील सर्वात मोठ्या नवीन ऊर्जा परिवर्तन प्रकल्पांची निर्मिती त्याने केली आहे. त्यानेच ‘वनतारा’ अ‍ॅनिमल शेल्टरची स्थापना केली, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.