अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्याला जगभरातून नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. अनेक दिवस सुरू असलेला हा विवाहसोहळा संपला असला तरी अंबानी कुटुंबाची चर्चा अजूनही सुरूच आहे. या शाही विवाहात विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. मात्र, एका व्यक्तीची चर्चा मात्र मोठी रंगली होती; ती व्यक्ती म्हणजे अनंत अंबानी यांची नॅनी ललिता डिसिल्व्हा या होय.

नुकत्याच ‘हिंदूस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनंत अंबानी हे लहानपणी जसे होते, तसेच आजही आहेत असे म्हटले आहे. त्या म्हणतात, “अनंत हा पहिला मुलगा होता, ज्याची मी काळजी घेतली. त्याच्या लग्नाला हजर राहणे माझ्यासाठी अविश्वसनीय होते. माझ्या भावना मी शब्दात सांगू शकत नाही. अनंत आजही तसाच आहे, जसा लहानपणी होता. तो खूप चांगला मुलगा होता आणि आजही तसाच आहे. पुढे त्या म्हणतात, “मी अंबानी कुटुंबाबरोबर ११ वर्षे काम केले आणि आजही मी त्यांच्या संपर्कात असते. जेव्हा ईशा आणि आकाश लहान होते तेव्हा त्यांचीदेखील मी देखभाल केली आहे. त्यावेळी नीता अंबानीला मी नीता वहिनी म्हणत होते, पण आता त्यांना मॅडम म्हणते. ती खूप श्रीमंत माणसं आहेत, पण आजही मला ते विसरले नाहीत. कष्ट कधीही वाया जात नाही. ईशा आणि आकाशच्या लग्नालादेखील त्यांनी मला बोलावले होते, पण त्यावेळी मी तैमूरबरोबर प्रवास करत असल्याने त्यांच्या लग्नाला हजर राहू शकले नाही, असे ललिता डिसिल्व्हा यांनी म्हटले आहे. ललिता डिसिल्व्हा या सध्या तैमूरच्या नॅनी आहेत.

हेही वाचा: करिअर ऐन भरात असताना लग्न का केलंस असं पुरुष कलाकाराला विचारलं जात नाही, मग आम्हाला हा प्रश्न का? रसिका सुनीलने बोलून दाखवली खंत

ललिता डिसिल्व्हा यांनी अनंत-राधिका यांच्या लग्नातील काही फोटो शेअर करत अंबानी कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. या फोटोंना कॅप्शन देत त्यांनी म्हटले होते की, अनंत आणि अंबानी कुटुंबाने मला दिलेल्या प्रेम आणि आनंदाबद्दल मी मनापासून आभार मानते. आमच्या गोड आठवणींचा मला आदर आहे. त्यांच्या अतूट प्रेमाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.

दरम्यान, अनंत-राधिकाच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा संपूर्ण जगभरात होत आहे. नुकताच राधिका-अनंतच्या लग्नातील शेवटचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचीदेखील मोठी चर्चा रंगली होती. अंबानी कुटुंबाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. याबरोबरच, कर्मचारी अंबानी कुटुंबासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हणत त्यांचे स्वागत केले होते. कर्मचाऱ्यांनीदेखील अंबानी कुटुंबाचं मन मोठं आहे, असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.