अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्ये भव्य स्वरूपात पार पडला. सध्या भारतातच नव्हे, तर जगभरात या सोहळ्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची एक मुलाखत झाली. त्या मुलाखतीत प्री-वेडिंग सोहळ्यातील त्यांच्या पोशाखांपासून ते अगदी व्हीआयपी पाहुण्यांच्या सोईंबद्दलही त्यांनी खुलासा केला आहे.
गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडलेल्या तीन दिवसांच्या या प्री-वेडिंग सोहळ्यात अंबानी कुटुंबाला ₹१२५० कोटी खर्च आल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ₹८,००,००० कोटींच्या संपत्तीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
अलीकडेच ‘वोग यूएस’ला दिलेल्या मुलाखतीत राधिका मर्चंट म्हणाली, “मला याची जाणीव आहे की हा अनुभव खूप कमी जणांच्या आयुष्यात येतो आणि त्यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. मला आशा आहे की, आमच्या लग्नामुळे साऱ्या जगाचं लक्ष ‘वनतारा’कडे जाईल. जगातील सर्वांत मोठे प्राणी पुनर्वसन केंद्र असलेला ‘वनतारा’ प्रोजेक्ट माझ्या आणि माझ्या पतीच्या हृदयाचा खूप जवळ आहे.”
हजारो पाहुण्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्याबद्दलही राधिकाने सांगितले. प्री-वेडिंग सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी, जोडप्याने वंताराच्या रेस्क्यू अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटरच्या मैदानावर पाहुण्यांसाठी जेवण ठेवले होते. “आम्ही आमच्या १,५०० पाहुण्यांना सामावून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. एका ऑडिओ-गाईड सिस्टीमद्वारे प्रत्येक जण येथे असलेल्या प्राण्यांशी संपर्क साधू शकेल, अशी व्यवस्था आम्ही केली होती,” असेही राधिका म्हणाली.
हेही वाचा… नववधू पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण निघाले हनिमूनला, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले होते. गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. माहितीनुसार, १२ जुलैला अनंत व राधिका यांचा मुंबईत शाही लग्नसोहळा होणार आहे. बिल गेट्स, मार्क झुकरबर्गपासून ते इवांका ट्रम्प, कार्ली क्लोस इ. जगभरातील प्रसिद्ध मंडळींनी या प्री-वेडिंग सोहळ्यात हजेरी लावली होती.