Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. शुक्रवार १२ जुलै रोजी अनंत – राधिका लग्नबंधनात अडकले आहेत. या भव्य लग्नसोहळ्याला भारतासह जगभरातील प्रसिद्ध कलाकारांना आणि नामवंत मंडळींना आमंत्रित करण्यात आलं होतं.
प्रसिद्ध रेसलर आणि अभिनेता जॉन सिना, गायक रेमा, किम कार्दशियन, युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन अशा अनेक मंडळींनी अनंत-राधिकाच्या या भव्य लग्नसोहळ्यासाठी मुंबईत हजेरी लावली होती.
अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. या सोहळ्यात रिहानाने परफॉर्मन्स सादर केला होता. या प्री-वेडिंगमध्ये एक हजार कोंटीचा खर्च करण्यात आला होता. या सोहळ्याला हॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
तर, या जोडप्याचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा युरोपमध्ये क्रुझवर पार पडला. या सोहळ्याची सुरुवात २९ मे रोजी झाली होती अन् १ जून रोजी समारोप झाला. हा प्री-वेडिंग सोहळा इटली ते फ्रान्सदरम्यान जाणाऱ्या लक्झरी क्रुझवर आयोजित करण्यात आला होता. यासाठी १२ खाजगी एअरक्राफ्ट आणि लग्झरी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या प्री-वेडिंगसाठी अंबानी कुटुंबाने ५०० कोटींइतका खर्च केला होता. अशाप्रकारे फक्त प्री-वेडिंगसाठी अंबानी कुटुंबाने १.५ कोटी रुपये खर्च केले.
थाटामाटात प्री-वेडिंग सोहळे केल्यावर १२ जुलै रोजी अनंत-राधिका विवाहबंधनात अडकले. या जोडप्याच्या लग्नाआधीच्या विधींचे व कार्यक्रमांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोन प्री-वेडिंगचं भव्य आयोजन केल्यानंतर आता या लग्नसोहळ्याला मुकेश अंबानी किती पटीने खर्च करतील याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. एका रिपोर्टनुसार आता या लग्नाचा खर्च समोर आला आहे.
सात लाखांची लग्नपत्रिका
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, अंबानी कुटुंबाकडून पाठवल्या गेलेल्या लग्नपत्रिकेची किंमत तब्बल सात लाख आहे, असं म्हटलं जातंय. या लग्नपत्रिकेमध्ये सोन्यासह चांदीच्या देवी-देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे.
हेही वाचा… चांदीचं मंदिर अन् सोनेरी मूर्ती…, ‘अशी’ आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लग्नपत्रिका, पाहा VIDEO
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी केला आहे ‘इतक्या’ कोटींचा खर्च
अनंत-राधिकाच्या या लग्नसोहळ्यात अनेक VVIP पाहुण्यांचा देखील समावेश होता. या सगळ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कोटींची घड्याळं देण्यात आल्याची चर्चा आहे. या गिफ्टची जबाबदारी स्वदेश ऑर्गनायझेशनकडे देण्यात आली होती. याशिवाय इतर पाहुण्यांना काश्मीर, बनारस आणि राजकोटवरून मागवलेल्या खास भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंब तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्च करत आहेत.
दरम्यान, अनंत-राधिकाच्या या भव्य लग्नसोहळ्यानंतर आज या जोडप्याला आशीर्वाद देण्याचा समारंभ पार पडेल. तर रविवारी सायंकाळी १४ जुलै रोजी सर्व पाहुण्यांसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.