Anant Ambani-Radhika Merchant Wedding: उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी उद्या, १२ जुलैला बोहल्यावर चढणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेलं लग्न अखेर उद्या मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. अनंत अंबानींची लग्नगाठ राधिका मर्चंटशी बांधली जाणार आहे. त्यामुळे सध्या अंबानींच्या अँटिलिया बंगल्यावर लग्नाची धामधूम सुरू आहे. बुधवारी १० जुलैला अँटिलिया बंगल्यावर शिव शक्ती पूजा आयोजित करण्यात आली होती; ज्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण लग्नाआधी शिव शक्ती पूजा का केली जाते? जाणून घ्या…
जुलै महिना सुरू झाल्यापासून अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे कार्यक्रम पाहायला मिळत आहे. सुरुवातीला २ जुलैला अंबानींनी ५० गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यानंतर मामेरू, संगीत, हळदी आणि मेहंदी समारंभ पार पडला. बुधवारी शिव शक्ती पूजा झाली. या पूजेला बॉलीवूड सेलिब्रिटींसह राजकारण्यातल्या मंडळींनी हजेरी लावली होती. अंबानी कुटुंबाच्या जुन्या रिती-रिवाजानुसार शिव शक्ती पूजा झाली. या पूजेतील अनंत अंबानींचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका बाजूला गायक अमित त्रिवेदी ‘नमो नमो’ हे लोकप्रिय गाणं गात असून दुसऱ्या बाजूला अनंत अंबानी व मुकेश अंबानी शिव ज्योतिर्लिंगाची पूजा करताना दिसत आहेत.
असं म्हटलं जातं की, लग्नाआधी शिव शक्ती पूजा केल्यानं वधू-वरांच्या जीवनात आनंद येतो. तसंच त्यांना भगवान शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय नवग्रह शांत होतात आणि जीवन सुखी होते. धार्मिक ग्रंथानुसार रामायणात सीतेनं लग्नाआधी शिव आणि पार्वतीची पूजा केली होती.
अँटिलिया बंगल्यामध्ये झालेल्या शिव शक्ती पूजेला अभिनेता रणवीर सिंह, शनाया कपूर, अनन्या पांडे, संजय दत्तसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान, ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार, अनंत व राधिकाच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची खास व्यवस्था करण्यात आली आहे. या पाहुण्यांना अंबानी कुटुंबाकडून कोट्यावधींचे महागडे रिटर्न गिफ्ट्स देण्यात येणार आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd