Kim Kardashian Ambani Wedding Look : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची गेल्या अनेक महिन्यांपासून सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर हे जोडपं आज विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नासाठी देश-विदेशातून पाहुणे मुंबईत दाखल झाले आहेत. बॉलीवूड कलाकारांसह किम कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल असे अनेक मान्यवर या लग्नाला उपस्थित राहिले आहेत. या सगळ्यात किम कार्दशियनच्या इंडो-वेस्टर्न लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
अनंत – राधिकाच्या लग्नासाठी अब्जाधीश किम कार्दशियन पहिल्यांदाच भारतात आली आहे. किमचं मुंबईच्या विमानतळावर आगमन होताच तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. किमबरोबर तिची बहीण ख्लोई सुद्धा भारतात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा या दोघी बहिणी मुंबई विमानतळावर दाखल झाल्या. किम व ख्लोई यांचं भारतात आगमन झाल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या दोघींचं पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय परंपरेनुसार स्वागत करण्यात आलं. यानंतर किमने रिक्षातून प्रवास करत मुंबई सफर केली.
किम कार्दशियनच्या लूकची चर्चा
किम अनंत-राधिकाच्या लग्नात कोणता लूक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर किमच्या लूकचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे. लाल रंगाची शिमरी साडी, डीपनेक ब्लाऊज असा इंडो-वेस्टर्न लूक करत किम अंबानींच्या विवाहसोहळ्याला पोहोचली आहे. तिच्या या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी या लूकवर नाराजी दर्शवली आहे. किमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर देखील या लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा : सपने मे मिलती है…; अनंत अंबानीच्या लग्नात प्रियांका चोप्रा, रणवीर अन् अनिल कपूर यांचा ‘झकास’ डान्स! पाहा व्हिडीओ
दरम्यान, १२ जुलै ते १५ जुलै या तीन दिवसांमध्ये अंबानींच्या घरचा हा लग्नसोहळा पार पडणार आहे. बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. शुक्रवार १२ जुलै रोजी (रात्री) अनंत-राधिका सात फेरे घेणार आहेत. यानंतर शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. तसेच रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.