Anant Ambani And Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी गुजरातमधील जामनगरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण राजकीय, बॉलीवूड ते क्रिकेट विश्वातील सर्व मान्यवरांना देण्यात आलं होतं. प्री-वेडिंग सोहळ्यात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध हॉलीवूड गायिका रिहानाची. बक्कळ मानधन घेत रिहानाने या प्री-वेडिंग कार्यक्रमात परफॉर्म केल्याचं सांगितलं जात आहे. अशातच तिचा जामनगर विमानतळावरील एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
प्री-वेडिंग कार्यक्रमात परफॉर्म केल्यावर आता रिहाना जामनगरमधून परतीच्या प्रवासाला निघाली आहे. गायिकेला पाहण्यासाठी तिच्या भारतीय चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. सध्या गायिकेची क्रेझ पाहता पापाराझींनी “तुझ्याबरोबर आम्ही फोटो काढू का?” अशी विचारणा तिच्याकडे केली. यावर रिहानाने जराही विचार न करता आपल्या सुरक्षा रक्षकांना मागे हटण्यास सांगितलं आणि पापाराझींसह विमानतळावर आलेल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांबरोबर फोटो काढले.
रिहानाचा जामनगर विमानतळावरील हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या गायिकेचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी या सुप्रसिद्ध हॉलीवूड गायिकेची तुलना बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबर केली आहे.
रिहानाच्या व्हिडीओवर “बॉलीवूड सेलिब्रिटींनी हिच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे”, “याला म्हणतात खरा कलाकार”, “हॉलीवूडची असून किती डाऊन टू अर्थ आहे”, “ही आहे खरी माणुसकी” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
हेही वाचा : “अनंत मला माझ्या वडिलांची आठवण करून देतो”, मुकेश अंबानींचे जामनगरमध्ये विधान, सूनबाईचं कौतुक करत म्हणाले…

दरम्यान, प्री-वेडिंग कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबाकडून जामनगरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाहुण्यांसाठी खास आलिशान तंबू उभारण्यात आले आहेत. या तंबूमध्ये सोफा, बेड, फ्रीज, टीव्हीपासून, एसीपर्यंतच्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.